समाविष्ट गावात पाण्याच्या टाक्यांसाठी वीस जागा ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 10:54 IST2024-12-20T10:54:34+5:302024-12-20T10:54:53+5:30
यासाठी महापालिकेने या गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

समाविष्ट गावात पाण्याच्या टाक्यांसाठी वीस जागा ताब्यात
पुणे :पुणे महापालिकेतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्यात आली असून, सध्या ३२ गावे महापालिकेत समाविष्ट आहेत. या गावांमध्ये स्थानिक जलस्रोत आणि टँकरशिवाय पाणीपुरवठ्यासाठी अन्य कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत.
या गावांमध्ये बेसुमार बांधकामे वाढत आहेत, लोकसंख्या वाढत आहे; पण पाणी नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहेत. यासाठी महापालिकेने या गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात ॲमेनिटी स्पेसच्या जागा ताब्यात आलेल्या २० जागांवर पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. या टाक्यांमध्ये सुमारे तीन कोटी ५० लाख लिटर दैनंदिन पाणीसाठा करता येणार आहे.
पुणे महापालिकेत २०१७ मध्ये ११ गावे आणि २०२१ मध्ये २३ गावे समाविष्ट झाली. त्यातील त्यापैकी लोहगाव वाघोली, सूस म्हाळुंगे, बावधन येथील पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहेत. समाविष्ट गावांमध्ये पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी जागांची आवश्यकता होती, त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने जागेची मागणी केली होती. महापालिकेत सुविधा क्षेत्र समितीची बैठक झाली. त्यामध्ये २० जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेकडून आराखडे तयार
आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक, सूस, म्हाळुंगे, बावधन, जांभूळवाडी, लोहगाव, वाघोली या गावांत जागा मिळाल्या आहेत. समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने आराखडे तयार करून घेतले आहेत. त्यातील काही योजनांचे काम सुरू झाले आहे. ज्या भागात पाणीपुरवठा होतो, त्याच्या एक तृतीयांश पाणीसाठा होईल इतक्या पाणी क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे आवश्यक आहे.
ॲमेनिटी स्पेसच्या बैठकीत २० जागा पाण्याच्या टाकीसाठी मिळाल्या आहेत. यातून दैनंदिन पाणीसाठा ३ कोटी ५० लाख लिटर इतका करता येणार आहे. या ठिकाणी टाक्यांचे बांधकाम लवकरच सुरू केले जाईल. -नंदकिशोर जगताप, विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका