सव्वातीनशे जण स्वेच्छानिवृत्त
By admin | Published: April 22, 2015 05:37 AM2015-04-22T05:37:27+5:302015-04-22T05:37:27+5:30
येथील टाटा मोटर्स कंपनीतील विविध विभागांतील ३२५ कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) स्वीकारली. व्हीआरएस घेण्याबाबत कामगारांवर
पिंपरी : येथील टाटा मोटर्स कंपनीतील विविध विभागांतील ३२५ कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) स्वीकारली. व्हीआरएस घेण्याबाबत कामगारांवर सक्ती केली जात असल्याचा आरोप कामगारांनी कंपनी व्यवस्थापनावर केला होता. व्यवस्थापनाच्या लेखी आश्वासनानंतर हा वाद निवळला होता.
वाहनउद्योगातील मंदीमुळे, तसेच वाढत्या स्पर्धेमुळे कंपनीच्या उत्पादनात घट झाली आहे. टाटा मोटर्सच्या देशभरातील धारवाड, जमशेदपूर या प्रकल्पांसह पिंपरी येथील कंपनीत कामगारांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) लागू करण्यात आली आहे. याची नोटीस फेब्रुवारीअखेरीस कंपनीत लावण्यात आली होती.
कंपनीत ६ हजारांपेक्षा अधिक कायमस्वरूपी कामगार आहेत. त्यांतील ४० वर्षांपुढील कामगारांना व्हीआरएसची योजना लागू केली होती. बहुसंख्य कामगार हे ४० वर्षांवरील आहेत. वारंवार गैरहजर राहणे, शारीरिक तंदुरुस्तीच्या अभावासह वेगवेगळ्या कारणांमुळे एकूण ३२५ कामगारांनी व्हीआरएस योजना स्वीकारली. त्यातील सर्वाधिक कामगार कमर्शिअल व्हेईकल प्रॉडक्शन विभागातील आहेत. वय वर्षे ४० ते ५०, ५० ते ५५, ५५ ते ६० या वयोगटांनुसार व्हीआरएसचे लाभ
दिले जाणार आहेत. योजनेची
मुदत १८ एप्रिल रोजी संपली. कंपनीच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्हीआरएस लवकरच जाहीर होणार आहे.
या संदर्भात व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संबंधित अधिकारी सुटीवर वा शहराबाहेर असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.(प्रतिनिधी)