तमाशापंढरीत अडीच कोटींची उलाढाल
By Admin | Published: April 9, 2016 01:50 AM2016-04-09T01:50:23+5:302016-04-09T01:50:23+5:30
या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे तमाशा बुकिंगवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र, गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवारी दिवसभरात २२५ हून अधिक सुपाऱ्या तमाशा खेळाच्या गेल्या
नारायणगाव : या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे तमाशा बुकिंगवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र, गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवारी दिवसभरात २२५ हून अधिक सुपाऱ्या तमाशा खेळाच्या गेल्या असून, अडीच कोटी रुपयांची उलाढाल या तमाशा पंढरीत झाली़, अशी माहिती लोकनाट्य मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, मा. वल्लभ बेनके तमाशानगरीचे (पंढरी) अध्यक्ष गणपत कोकणे, उपाध्यक्ष अन्वर पटेल यांनी दिली़
लोकनाट्य तमाशाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा कलापंढरीत गुढीपाडव्यानिमित्त तमाशाची सुपारी देण्यासाठी राज्यातून गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गाव ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आल्याने तमाशापंढरीत यात्रेचे रूप आले होते. आपल्या गावातील यात्रेनिमित्त तमाशाची सुपारी देण्यासाठी गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गाव ग्रामस्थ येथील ३३ राहुट्यांमध्ये आले होते. दिवसभरात २२५ हून अधिक तमाशा कार्यक्रमांच्या सुपाऱ्या गेल्या आहेत. जवळपास २ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल या तमाशापंढरीत झाली आहे. तमाशा ठरविताना तमाशात कलाकार किती, महिला कलावंत किती, वग कोणता, गावी किती होणार याची प्रामुख्याने विचारणा गावपुढाऱ्यांकडून होत होती. कालाष्टमी व पौर्णिमा या दिवसांसाठी तमाशा खेळाला जास्त मागणी होती़
मोठ्या फडमालकांना दिवसभरात ११ ते १५ सुपाऱ्या मिळाल्या. तर मध्यम आणि छोट्या फडाचे ५ ते ८ सुपाऱ्या गेल्या. राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने त्याचा फटका तमाशा बुकिंगला बसेल असे वाटत असताना सर्वच फडमालकांना यंदाचे वर्ष बऱ्यापैकी गेले. तमाशा फडमालकांच्या दृष्टीने पौर्णिमा व कालाष्टमी या दिवसांना विशेष महत्त्व असून, या तारखांना लोकनाट्य तमाशा खेळाची सुपारी सर्वाधिक किमतीची मिळते़ या वर्षी सर्वाधिक सुपारी भिका-भीमा यांची गेली. त्यांची पौर्णिमेची सुपारी ३ लाख २१ हजारांना गेली. मंगला बनसोडे यांची पौर्णिमा २ लाख ६१ हजाराला आणि कालाष्टमी २ लाख ७५ हजाराला, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर पौर्णिमा २ लाख २५ हजारांना आणि कालाष्टमी २ लाख ४५ हजाराला गेली. मालती इनामदार पौर्णिमा २ लाख १ हजाराला आणि कालाष्टमी २ लाख १ हजाराला, चंद्रकांत ढवळपुरीकरसह किरणकुमार ढवळपुरीकर पौर्णिमा २ लाख १ हजाराला आणि कालाष्टमी २ लाख १ हजाराला, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर पौर्णिमा १ लाख ८१ हजाराला, अंजली नाशिककर पौर्णिमा १ लाख ६० हजाराला गेली. काळू नामू वेळवंडकरसह अमन तांबे पुणेकर पौर्णिमा २ लाख ५१ हजाराला
आणि कालाष्टमी २ लाख ११ हजाराला यांच्यासह जगनकुमार वेळवंडकर, विनायक महाडिक, आनंद लोकनाट्य जळगांवकर, हरिभाऊ बढे नगरकर, काळू-बाळू , दत्ता पुणेकर, संध्या माने सोलापूरकर, रवींद्र खोमणे औरंगाबादकर, जगनकुमार वेळवंडकर, लता पुणेकर यांच्या सुपाऱ्या गेल्या, अशी माहिती संजय अडसरे यांनी दिली़.