खेड तालुक्यात दुचाकीचोरांचा धुमाकूळ, आठ महिन्यांत २७ दुचाकी लंपास, एकाही घटनेचा तपास नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 02:33 AM2017-09-12T02:33:59+5:302017-09-12T02:34:14+5:30
खेड तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जानेवारी २०१७ ते आजतागायत आठ महिन्यांत जवळपास २७ दुचाकींवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. राजगुरुनगर शहरात दुचाकीचोरांची टोळी सक्रिय आहे. मात्र, अद्यापही कुणाला अटक करण्यास पोलिसांना यश आलेले नाही.
राजगुरुनगर : खेड तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जानेवारी २०१७ ते आजतागायत आठ महिन्यांत जवळपास २७ दुचाकींवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. राजगुरुनगर शहरात दुचाकीचोरांची टोळी सक्रिय आहे. मात्र, अद्यापही कुणाला अटक करण्यास पोलिसांना यश आलेले नाही.
दुचाकीचोरींच्या सत्रामुळे शहरासह तालुक्यातील वाहनांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दुचाकीचोरीचा शोध लावण्यात खेड पोलीस अपयशी ठरत आहेत. राजगुरुनगर शहरीकरणाचा विस्तार वाढला आहे. औद्योगिकीकरण वाढल्याने कामगारांनी या शहराला पसंती देत आहेत. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह तालुक्यात वाहनांची गर्दी वाढली असताना चोरट्यांनी दुचाकीचोरीवर लक्ष्य केले आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून २७ दुचाकी चोरीला गेल्या असल्याबाबत खेड पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना वाहनचोरीचा छडा लावण्यात अपयश आले आहे. राजगुरुनगर पोलिसांनी याबाबत कारवाई करीत दुचाकीचोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. गाड्या चोरीला जाण्याचे वाढते प्रमाण पाहता दुचाकीमालक धास्तावले आहेत. भरदिवसा दुचाकीचोरी होत आहेत. आठ महिन्यांत २७ गाड्यांची चोरी ही बाब अत्यंत गंभीर आहे.
यापैकी एकही गाडीचोरीचा गुन्हा उघडकीस आलेला नाही. गाड्या चोरीस जाण्याचे वाढते सत्र राजगुरुनगरकरांना धोकादायक ठरत आहे. पोलीस प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन दुचाकीचोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
राजगुरुनगर शहर पोलीस ठाण्यातील आठ महिन्यंतील गुन्हे : विनयभंग १७, खून ५, खुनाचा प्रयत्न ७, बलात्कार ६, जबरी चोरी १०, घरफोडी १०, मारामारी ११, फसवणूक १, अपहरण १०, दरोडे २, अपघाती मृत्यू २२, दुखापती २१, मोटारसायकलचोरी २७, जुगार ७, दारू ५५, ठकबाजी १३ असे एकूण २०५ गुन्हे दाखल आहेत.
राजगुरुनगर शहरातून (दि. १०) रात्री समतानगर वाडारोड, वाळुजस्थळ, राक्षेवाडी येथून तीन मोटारसायकल चोरट्यांनी चोरल्या आहेत. याबाबत खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.