पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत दुप्पट मुले कोरोनाग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:34+5:302021-06-24T04:09:34+5:30

पुणे : मार्च २०२० पासून मे २०२१ पर्यंत ० ते १० वयोगटातील २१,९११ बालकांना, तर ११ ते १८ वयोगटातील ...

Twice as many children were coronary in the second wave as in the first | पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत दुप्पट मुले कोरोनाग्रस्त

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत दुप्पट मुले कोरोनाग्रस्त

Next

पुणे : मार्च २०२० पासून मे २०२१ पर्यंत ० ते १० वयोगटातील २१,९११ बालकांना, तर ११ ते १८ वयोगटातील ३६,७७३ मुलांना कोरोनाची लागण झाली. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात म्हणजेच कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या उच्चाकांत कोरोनाग्रस्त मुलांची संख्या ११,७२६ इतकी होती. दुसऱ्या लाटेच्या उच्चाकांत म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात हाच आकडा २४, ५२५ पर्यंत पोहोचला. म्हणजेच दुसऱ्या लाटेत दुप्पट मुलांना कोरोनाची बाधा झाली. लहान मुलांसाठी अद्याप कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने त्यांची जास्त काळजी घेणे गरजेचे असल्याचे आणि मास्कचा वापर अनिवार्य असल्याची बाब डॉक्टरांकडून अधोरेखित केली जात आहेत.

बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारीख म्हणाले, ''ताप, खोकला, श्वास लागणे, थकवा, घसा खवखवणे, अतिसार, गंध कमी होणे, चव कमी होणे, जठरासंबंधी आजाराची लक्षणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, कोरडा खोकला आणि स्नायू दुखणे यांसारखी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. मुलांमध्ये ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.''

लहान मुलांमध्ये कोविड-१९ संसर्ग झाल्यास साधारणतः या आजाराची लक्षणे आठवडाभर किंवा महिनाभरसुद्धा दिसून येतात. संशोधनानुसार, कोणतीही दीर्घकालीन वैद्यकीय पार्श्वभूमी परिस्थिती नसलेली मुले किंवा गंभीर कोविड १९ संसर्गात ज्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आलेली आहेत, अशा लहान मुलांना कोरोनातून बरे झाल्यानंतर विविध आजारांचा त्रास होत आहे. स्नायू दुखणे, अशक्तपणा, वास आणि चव कमी होणे, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि थकवा मुलांमध्ये दिसून येतो. लाँग कोविड असलेल्या मुलांची संख्या अद्याप माहिती नाही, परंतु मुलांमध्ये लक्षणांमध्ये थकवा, घसा खवखवणे, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे आणि अशक्तपणा यांचा समावेश असू शकतो.

-----

कोविड संक्रमणापासून मुलांना कसे संरक्षण करावे?

मुलांना कमी वेंटिलेशन तसेच मर्यादित आणि बंद जागांवर घेऊ नका. मुलांना घराबाहेर जाताना मास्क लावायला सांगा आणि वारंवार हात स्वच्छ धुवा. फरशी, दरवाजा, हँडल्स आणि नळ यासारख्या पृष्ठभागास स्पर्श केल्यावर हात सॅनिटायझर करा. खोकला किंवा शिंकताना मुलांना तोंड आणि नाक रूमालाने झाकायला सांगा. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना घरच्या घरी व्यायाम करायला मदत करा. मुलांना नियमितपणे पौष्टिक आहार द्या. बाहेरील तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन लहान मुलांना करू देऊ नका. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी लोकांशी बोलताना सामाजिक अंतर ठेवा.

-------

१ मार्च ते १६ जून या कालावधीत ० ते १८ वयोगटातील २६,४८८ मुलांना कोरोनाची बाधा झाली. मुलांमधील मृत्युदर ०.०५ टक्के इतका आहे. बहुतांश मुलांमध्ये सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे आढळून आली आहेत. तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून राजीव गांधी रुग्णालय, येरवडा येथे लहान मुलांसाठी २०० बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये १० टक्के बेड बालकांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Twice as many children were coronary in the second wave as in the first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.