खोदकामामुळे सहकारनगरमध्ये दोनवेळा वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:12 AM2021-05-25T04:12:24+5:302021-05-25T04:12:24+5:30

पुणे : सहकारनगर दोनमध्ये पाण्याच्या पाईपलाईनसाठी सुरु असलेल्या खोदकामात, महावितरणच्या वीजयंत्रणेला वारंवार तडाखे बसत आहे. परिणामी गेल्या १८ तासांमध्ये ...

Twice power outage in Sahakarnagar due to excavation | खोदकामामुळे सहकारनगरमध्ये दोनवेळा वीज खंडित

खोदकामामुळे सहकारनगरमध्ये दोनवेळा वीज खंडित

Next

पुणे : सहकारनगर दोनमध्ये पाण्याच्या पाईपलाईनसाठी सुरु असलेल्या खोदकामात, महावितरणच्या वीजयंत्रणेला वारंवार तडाखे बसत आहे. परिणामी गेल्या १८ तासांमध्ये दोनवेळा सहकारनगरमध्ये दीड ते दोन तासांच्या खंडित वीजपुरवठ्याचा वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

पर्वती विभागांतर्गत दत्तवाडी उपकेंद्रातून अरण्येश्वर २२ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीद्वारे सहकारनगर एक व दोन, तुळशीबागवाले कॉलनी, माडीवाले कॉलनी आदी परिसरातील सुमारे ११ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या भूमिगत वीजवाहिनीच्या लगतच पाण्याच्या पाईपलाईनसाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत संबंधित कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजता केलेल्या खोदकामात गणेश मंदिरजवळ ही भूमिगत वाहिनी तोडली. त्यामुळे सुमारे दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु, महावितरणाकडून तातडीने पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली व तोडलेल्या वाहिनीची दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

तसेच या घटनेनंतरही सोमवारी (दि. २४) सकाळी ११च्या सुमारास स्वानंद चौकात जेसीबीने झाड तोडण्यात आले. योग्य खबरदारी न घेतल्याने हे झाड महावितरणच्या सहा पोलवर पडले आणि ६ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे सहकारनगर दोनमधील सुमारे दीड हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तास खंडित राहिला.

महावितरणकडून तक्रार

खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्यामुळे दुरुस्तीचा आर्थिक भार व ग्राहकांचा नाहक रोष महावितरणला सहन करावा लागला. याबाबत महावितरणकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वीज पुरवठा खंडित झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. महावितरणने महापालिकेस लेखी पत्र देऊन यापुढे खोदकाम करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Twice power outage in Sahakarnagar due to excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.