आदिवासी भागात दुप्पट वीजबिले
By admin | Published: April 21, 2015 03:07 AM2015-04-21T03:07:05+5:302015-04-21T03:07:05+5:30
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जनतेला दुप्पट वीजबिले येत आहेत.
तळेघर : महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जनतेला दुप्पट वीजबिले येत आहेत. ही वीजबिले भरता-भरता आदिवासी जनतेचे कंबरडे मोडले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये गेले पाच ते
सहा महिन्यांपासून वीजबिलांचे
रीडिंग अंदाजे घेतले जाते.
यामुळे या भागातील जनतेला वीज मीटरवर एक रीडिंग व या आकडेवारीच्या दुप्पट आकडेवारी लावून दुप्पट वीजबिल येते. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कानावर या गोष्टी
घालूनही या विभागातील
अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष
करत असल्याचे बजरंग दलाचे
पश्चिम भागातील अध्यक्ष प्रदीप
उंडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
महिन्याच्या महिन्याला येणाऱ्या बिलामुळे वीजबिलाचे रीडिंग कार्यालयात पोहोचते न पोहोचते तोच बिल ग्राहकाच्या हातात येते. यामुळे या परिसरातील जनतेला नाहक
जादा बिल भरावे लागते.
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये सरसकट सत्तर (७० रुपये) बिल प्रत्येक ग्राहकाला आले आहे. त्याच्या मागे दोन-तीन महिन्यांपूर्वी ९० रुपये प्रत्येकी वीजबिल आले होते. या बिलाची कसर काढून पुढील येणारे बिल तिपटीने दिले जाते. यामुळे महावितरणापुढे आदिवासी जनता हतबल झाली आहे.
गलथान कारभार सुधारावा अन्यथा मंचर-भीमाशंकर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रदीप उंडे यांनी सांगितले.
(वार्ताहर)