खेड पंचायत समितीच्या राजकारणात 'ट्विस्ट' ; उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या सदस्यांना महत्वाचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:58 PM2021-08-16T18:58:40+5:302021-08-16T19:02:08+5:30

राज्यात महाआघाडी सरकार असताना खेड तालुक्यात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

'Twist' in the politics of Khed Panchayat Samiti; Uddhav Thackeray's important order to Shivsena members | खेड पंचायत समितीच्या राजकारणात 'ट्विस्ट' ; उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या सदस्यांना महत्वाचा आदेश 

खेड पंचायत समितीच्या राजकारणात 'ट्विस्ट' ; उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या सदस्यांना महत्वाचा आदेश 

Next

राजगुरूनगर : राज्यात महाआघाडी सरकार असताना खेड तालुक्यात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीकडून शिवसेनेची भक्कम फळी फोडत वाघाला घायाळ करण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरेंनी खासदार संजय राऊत यांना 'खेड मोहिमे'वर पाठवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला गर्भित इशारा दिला होता. आता याच शिवसेनेच्या सभापतींवर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर बुधवारी मतदान होत आहे. याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या  सदस्यांना महत्वाचा आदेश दिला आहे. 

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात २४ मे रोजी भाजपाच्या विद्यमान उपसभापतीसह राष्ट्रवादी ४ आणि शिवसेनेच्या ६ अशा ११ सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. यानंतर ३१ मे रोजी मोठ्या पोलिस बंदोबस्तासह सभेचे पिठासीन अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी अविश्वास ठरावावर सभा घेऊन मतदान घेतल्यानंतर ११ विरोधात ३ असा ठराव मंजूर झाला होता. 

खेड पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सदस्यांना शिवसेनेने व्हीप जारी केला आहे.सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात मंजुर झालेल्या अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान करू नये असा पक्षादेश शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्ष कार्यालयाकडून मिळाला आहे. शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या सदस्याना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे सदस्य काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात मंजुर झालेल्या अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेर अविश्वास ठराव घेण्याचे २७ जुलैच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी बुधवारी (दि १८) रोजी अविश्वास ठरावाची सभा घेण्याबाबतचे आदेश जारी केले आहे. समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता या अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेच्या बहुमताला सुरुंग लागल्याने पक्षाच्या सभापती विरोधात शिवसेनेच्याच बंडखोरांनी केलेल्या गटबाजीने संपूर्ण तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते. 
 
दरम्यान, सभापती भगवान पोखरकर यांनी अविश्वास ठरावाबाबत सहलीवर गेलेल्या सदस्यांना सिहंगड परिसरातील एका हॉटेलमध्ये चांगलाच राडा केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक झाली होती. त्यामुळे अविश्वास ठरावाच्या सभेला कारागृहातुन भगवान पोखरकर यांना पोलिस बंदोबस्तासह आणण्यात आले होते.

Web Title: 'Twist' in the politics of Khed Panchayat Samiti; Uddhav Thackeray's important order to Shivsena members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.