वीज पडून दोन एकर ऊस पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:43 AM2018-10-02T00:43:47+5:302018-10-02T00:44:11+5:30
दिवसभर उन्हाचा तडाखा असल्याने उसाच्या पाचटाने पेट घेतला. दरम्यान शेजारील शेतकरीवर्गाने आग विझवून इतर उसाची शेती वाचविण्याचा प्रयत्न केला.
रांजणगाव सांडस : राक्षेवाडी (ता. शिरूर) येथे शेतकरी दगडू सोनबा शिंदे यांच्या ऊसशेताजवळील नारळाच्या झाडावर वीज पडून आग लागली. खाली उसाची शेती असल्याने दोन एकर ऊस जळून गेल्याची घटना घडली.
दिवसभर उन्हाचा तडाखा असल्याने उसाच्या पाचटाने पेट घेतला. दरम्यान शेजारील शेतकरीवर्गाने आग विझवून इतर उसाची शेती वाचविण्याचा प्रयत्न केला. वर्षभर काबाडकष्ट करून हिरवीगार केलेली उसाची शेती पडलेल्या विजेमुळे नष्ट झाल्यामुळे शिंदे परिवार हळहळ व्यक्त करत आहे. यातून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे नैसर्गिक आपत्ती निधीतून त्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. आग विझविण्यासाठी राहुलदादा काळभोर, नवनाथ राक्षे, संदीप राक्षे, तात्या काळभोर, बापू शेळके, संतोष काळभोर, सहदेव राक्षे, बाबा पठारे,आदी शेतकरीवर्गाने औषधे मारण्याच्या पंपात पाणी भरून आग आटोक्यात आणली. आग विझविण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केल्यामुळे आग आटोक्यात आली. नाही तर अनेक एकरांवरील ऊस जळाला असता.