PMC: सव्वादोन लाख पुणेकरांनी साेडले ४० टक्के सवलतीवर पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 11:15 AM2023-12-19T11:15:34+5:302023-12-19T11:20:02+5:30
२ लाख २५ हजार पुणेकरांनी ४० टक्के सवलतीचे अर्जच भरून दिले नाहीत....
पुणे : स्वतः राहत असलेल्या सदनिकेच्या मिळकत करात ४० टक्के सवलत मिळवण्यासाठी अवघ्या १ लाख पुणेकरांनी महापालिकेकडे मुदतीत पीटी-३ अर्ज भरून दिले आहेत. २ लाख २५ हजार पुणेकरांनी ४० टक्के सवलतीचे अर्जच भरून दिले नाहीत. त्यामुळे त्यांना ही सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवासी मिळकतींना महापालिकेकडून मिळकत करात ४० टक्के सवलत दिली जात होती. ती रद्द केल्यानंतर संपूर्ण मिळकत कर भरावा लागत होता. याविषयी नाराजी व्यक्त झाल्यानंतर राज्य सरकारने सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेने सन २०१९ पासून (नवीन मिळकत) निवासी मिळकतींकडून पूर्ण कर वसूल केला आहे. अशा तीन लाख मिळकती असून, त्यांना ४० टक्क्यांची सवलत मिळविण्यासाठी पीटी -३ अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. तसेच ज्या निवासी मिळकतींची ४० टक्के सवलत रद्द करण्यात आली, अशांना ही सवलत पुन्हा लागू करण्यासाठी महापालिकेकडून 'पीटी - ३२ अर्ज भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरण्याची १५ नोव्हेंबर अंतिम मुदत होती. मात्र, अपेक्षित अर्जांची संख्या न आल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
ज्या सव्वातीन लाख मिळकतधारकांची ४० टक्के सवलत रद्द झाली, ते पीटी-३ अर्ज सादर करतील या भरवशावर या सर्व मिळकतींना २०२३-२४ मध्ये ४० टक्के सवलत देऊनच बिल दिले होते. मात्र, या काळात अवघ्या १ लाख पुणेकरांनी पीटी-३ अर्ज भरून दिले आहेत. त्यामुळे ज्या मिळकतधारकांची ४० टक्के सवलत रद्द झाली होती; मात्र त्यांनी पीटी-३ अर्ज भरून दिला नाही, त्यांना दुसऱ्या सहामाहीच्या बिलात ४० टक्के वाढीव रकमेची बिले पाठविण्यात येणार आहेत. ही बिले पुढील आठवड्यापासून दिली जाणार आहेत.
पहिल्या सहामाहीत दिलेली ४० टक्के सवलतीची रक्कम दुसऱ्या सहामाहीच्या बिलात थकबाकी म्हणून भरावी लागणार आहे. याशिवाय संबधितांना सन २०१९ पासून ४० टक्के सवलत पालिका देणार होती, तीदेखील रद्द होणार आहे.