पुणे स्टेशनवरून अडीच वर्षीय बालकाचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 07:25 PM2022-12-11T19:25:25+5:302022-12-11T19:25:41+5:30
रेल्वे स्टेशनवर एवढ्या वर्दळीच्या ठिकाणाहून बालकाचे अपहरण झाल्याने रेल्वे पोलिसांसमोर मुलाला शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे
पुणे : पुणे स्टेशनवरून अडीच वर्षीय बालकाचे अपहरण झाले असल्याची चर्चा रविवारी दिवसभर स्टेशन परिसरात होती. बालकाच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार करताच पोलिसांची पथके बालकाच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. एकीकडे शहरात अपहरणांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना, रेल्वे स्टेशनवर एवढ्या वर्दळीच्या ठिकाणाहून बालकाचे अपहरण झाल्याने रेल्वे पोलिसांसमोर मुलाला शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात मजूरी करणारे एक दांपत्य त्यांच्या मुळगावी झारखंड येथे जाण्यासाठी शनिवारी पुणे स्टेशनवर आले होते. या पती-पत्नीसोबत त्यांचा अडीच वर्षाचा चिमुरडाही होता. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळील सरकत्या जिन्याजवळ ते बसले होते. रात्री साडेआठच्या सुमारास ते हावडा एक्सप्रेसने झारखंडला जाणार होते.
दरम्यान, एक महिला व एक पुरूष त्यांच्याजवळ आले. त्यांनी थोड्यावेळाने झारखंडला जात असलेल्या दांपत्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. महिलेने तिच्याजवळील खाऊ मुलाला खाण्यास दिला. यादरम्यान मुलाबद्दल आपल्याला जिव्हाळा आहे, असे दाखवून ते दोन भामटे चिमुरड्याला सोबत घेऊन जातो आणि त्याच्यासाठी खाऊ आणतो म्हणून घेऊन गेले. त्यांची बराचवेळ वाट पाहूनही ते परत आले नाही. मुलाच्या आई-वडीलांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पुणे रेल्वे पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र चिमुरडा सापडला नाही. यानंतर आई-वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्या चिमुरड्याचा शोध घेत आहेत.