फुकट्या प्रवाशांकडून अडीच कोटी वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 02:23 AM2018-07-14T02:23:20+5:302018-07-14T02:23:34+5:30
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध मार्गांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४० हजार २३३ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ कोटी ४३ लाख रुपयांंचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध मार्गांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४० हजार २३३ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ कोटी ४३ लाख रुपयांंचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर या तपासणीसह विनातिकीट प्रवासासह इतर प्रकरणांमध्ये एकूण ४ कोटी ६८ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. एकूण ९० हजार प्रकरणांमध्ये हा दंड आकारण्यात आला.
रेल्वेकडून एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. पुणे विभागातील पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज व मिरज-कोल्हापूर या मार्गांवर प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत ७५ हजार ५४४ प्रकरणांमध्ये ४ कोटी ३४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर व अतिरिक्त व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. रेल्वेकडून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते. त्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.