त्रिपुरारी पौर्णिमेसाठी सजले अडीचशे वर्ष जुने 'कामेश्वर मंदिर'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 06:04 PM2019-11-12T18:04:37+5:302019-11-12T18:22:59+5:30
. शिव-पार्वती विवाहानंतर निघालेली वरात दर्शविणारी ही मुर्ती आहे.
पुणे : पुण्यातील पेठांचे आणि पेशवेकालीन इतिहासाचे अतुट नाते आहे. पेशवेकाळाशी असेच नाते सांगणारा नेणे घाट आजही शनिवार पेठेमध्ये अस्तित्वात आहे. या घाटावर वसलेल्या मंदिरांपैकी तब्बल २५२ वर्षे जुने ' कामेश्वर मंदिर' त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सजले आहे. गाभाऱ्यामध्ये सुंदरशी फुलांची आरास आणि मंदिराभोवती काढण्यात आलेल्या रांगोळीने मंदिराच्या सौंदर्यात भर घातली.
हे मंदिर पेशवेकालीन असून हेमाडपंती शैलीचे पूर्ण दगडी बांधकाम आहे. पेशव्यांचे सरदार लेले यांनी याभागात घाट बांधला तसेच हे मंदिर बांधले. मंदिराचे दगडी प्रवेशद्वार आकर्षक असून महिरपी धाटणीचा नगारखाना विशेष आकर्षण ठरतो. मंदिराच्या आतमध्ये गोल आकाराचा मंडप असून गाभाऱ्याच्या मुखाशी सुर्यदेव आणि श्री विष्णूच्या देखण्या मुर्त्या आहेत. गाभाऱ्यामध्ये शिवलिंग असून आकाराने मध्यम परंतू तेवढेच देखणे आहे. या शिवलिंगावर चांदीचा मुखवटा चढविण्यात आला होता. यासोबतच गाभाºयात आणखी तीन देखण्या मुर्त्या आहेत. मधोमध नंदीवर आरुढ झालेले शंकर असून शंकराने पार्वतीला मांडीवर घेतलेले आहे. शिव-पार्वती विवाहानंतर निघालेली वरात दर्शविणारी ही मूर्ती आहे. तर उजव्या बाजूला कामेश्वरी देवीची मूर्ती आणि डाव्या बाजूला उजव्या सोंडेचा सिध्दीविनायक आहे.
पानशेत धरण 1961 साली फुटल्यानंतर पुण्यात पूर आला होता. या पुराचे पाणी मंदिराच्या कळसाच्या वर चढले होते. नदीपात्राला अगदी लागून असलेले हे मंदिर त्यावेळी पूर्णपणे पाण्यात गेलेले होते. सरदार लेले यांनी मुठा नदीवर घाट बांधला होता. भाविक या घाटावर अंघोळ करुन ओल्यानेच मंदिरात येऊन दर्शन घेत असत असे मंदिराचे व्यवस्थापक प्रकाश आठवले यांनी सांगितले. या मंदिराचा मूळ पुरुष असून तो एका नागाच्या रुपात वास्तव्य करुन असल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नंदी व मंदिरातील देवांच्या मूर्त्या धुतल्यानंतर त्याचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेली कुपनलिकेची व्यवस्था. मुर्तीच्या भोवतीने पाणी एका नलिकेमधून जमिनीखाली जाते. जमिनीखालून असलेल्या गुप्त नलिकेद्वारे हे पाणी नदीपात्राकडे वाहून जाण्याची व्यवस्था आहे.
कामेश्वर मंदिरासोबतच नेणे घाटावर आणखीही पेशवेकालीन मंदिरे आहेत. कामेश्वराच्या शेजारी बाणेश्वराचे मंदिर असून पूर्वेच्या दिशेला अमृतेश्वर पश्चिमेला ओंकारेश्वर देवस्थान आहे. यासोबतच गुपचूप यांचे वरद विनायक मंदिर, वीर मारुती, विष्णू मंदिरही आहे.