दोनशे जागांसाठी अडीच लाख विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:03+5:302021-03-13T04:21:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) १४ मार्चला होणारी राज्य पूर्व परीक्षा २१ मार्चला होणार असल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) १४ मार्चला होणारी राज्य पूर्व परीक्षा २१ मार्चला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्य पूर्व परीक्षेला अवघ्या दोनशे जागांसाठी राज्यातील तब्बल २ लाख ६२ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा होणार आहे.
परीक्षेला जाताना कोरोनाच्या पार्शवभूमीवर यापूर्वीच जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. याबाबतच्या सूचनांचे परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर सहा महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आल्याचे एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोनाच्या पार्शवभूमीवर एमपीएससीला परीक्षांच्या आयोजनासाठी विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि. ११) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले. मात्र याबाबतच्या मार्गदर्शक सूचना यापूर्वीच संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचे पालन विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे.
उमेदवारांना एमपीएससीकडून मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज दिले जाणार आहेत. असे असले तरी एमपीएससीने दिलेल्या सूचनांचे पालन विद्यार्थ्यांना करावेच लागणार आहे. जाहीर परिपत्रकानुसार, परीक्षा केंद्रात येताना उमेदवाराने तीन पदरी कापडाचे मास्क किंवा पट्टी बांधणे आवश्यक आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छतेची काळजी घेऊन सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास परीक्षा केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे. स्वतःचा जेवणाचा दाब घेऊन यावा. पाण्याची बाटली सोबत ठेवावी. राज्य सेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर असल्याने उमेदवाराला परीक्षा केंद्राबाहेर पडता येणार नाही. तसेच उमेदवाराने एकमेकांचे शैक्षणिक साहित्य वापरण्यास मनाई आहे. तसेच सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.