दिवसभरात अडीच हजार रुग्णवाढ, सोमवारचा दिवस दिलासादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:09 AM2021-03-30T04:09:01+5:302021-03-30T04:09:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आपत्तीनंतर शहरात एकाच दिवशी ४ हजार ४२६ इतकी सर्वाधिक कोरोनाबाधितांची वाढ रविवारी (दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आपत्तीनंतर शहरात एकाच दिवशी ४ हजार ४२६ इतकी सर्वाधिक कोरोनाबाधितांची वाढ रविवारी (दि. २८) झाली़ परंतु, दुसऱ्या दिवशी रविवारच्या तुलनेने एक हजार तपासणी कमी झाली असताना, शहरात हा वाढीचा आकडा सुमारे दोन हजारांनी कमी आला आहे़ सोमवारी दिवसभरात २ हजार ५४७ नवे रुग्ण आढळून आले असून, गेल्या आठवड्यात तीन हजारांच्या पुढे गेलेली रूग्णवाढ या आठवड्याच्या प्रारंभी अडीच हजारांवर आल्याचे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळाले आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी १५ हजार १५३ जणांची तपासणी करण्यात आली़ तर रविवारी १६ हजार ८०४ जणांची तपासणी करण्यात आली होती़ आजमितीला शहरात ६७४ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ सध्या शहरातील ९४ विविध खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये २ हजार ८८० रुग्ण आॅक्सिजनसह उपचार घेत आहेत़
सोमवारी व रविवारी मिळून ४ हजार ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ सध्या शहरात ३२ हजार ८७५ सक्रिय रूग्ण असून, रविवारच्या तुलनेत सक्रिय रुग्णसंख्या २४८ ने कमी झाली आहे़ तपासणीच्या तुलनेत रविवारी कोरोनाबाधितांची टक्केवारी २६़ ३३ टक्के, तर सोमवारी (दि.२९) १६़ ८० टक्के इतकी खाली आली आहे़
दरम्यान, आज दिवसभरात ३२ जणांचा (८ पुण्याबाहेरील) व रविवारी ३५ जणांचा (७ पुण्याबाहेरील) मृत्यू झाला आहे़ शहरात आजपर्यंत १५ लाख १५३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ६१ हजार ६५९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख २३ हजार ५४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार २४३ इतकी झाली आहे़
==========================