अडीच वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षिकेची मारहाण
By admin | Published: December 23, 2016 01:06 AM2016-12-23T01:06:38+5:302016-12-23T01:06:38+5:30
इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होऊन महिना होत नाही, तोच सिंहगड रस्त्यावरील एका शाळेत ‘प्ले ग्रुप’ला प्रवेश घेतलेल्या अडीच
पुणे : इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होऊन महिना होत नाही, तोच सिंहगड रस्त्यावरील एका शाळेत ‘प्ले ग्रुप’ला प्रवेश घेतलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला शिक्षिकेकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घरात व अंगणात हसण्याखेळण्याच्या वयात अनेक पालक मुलांना शाळेत पाठवतात. शाळेतील वातावरणाची आणि शिक्षकांची कोणतीही चौकशी न करता, जवळच्या कोणत्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करतात. शाळेतील शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि शिक्षणाची जबाबदारी सोडून पालक मोकळे होतात. मात्र, पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील दळवीवाडी येथील एका शाळेतील शिक्षकेने गुरुवारी अडीच वर्षांच्या मुलाच्या कानाखाली मारली. या लहान मुलाच्या कानाखाली बोटांचे वळही उमटले आहेत. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पालकांनी शाळेला याचा जाब विचारला असता, प्रशासनाकडून सारवासारव केली जात आहे.
पुण्यातील ट्री हाऊसच्या काही शाळा गेल्या आठवड्यात अचानक बंद पडल्या. त्यामुळे मुलांना कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा, असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला. पूर्व प्राथमिक शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे या शाळेवर कारवाई करण्यास शिक्षण विभागाने हतबलता दाखवली.