म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:29+5:302021-06-16T04:15:29+5:30
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर काही नागरिकांना म्युकरमायकोसिस या रोगाची लागण होत असून, या रोगाच्या उपचारासाठी ‘लिपोझोमल ऑफोटेरीसीन बी’ हे ...
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर काही नागरिकांना म्युकरमायकोसिस या रोगाची लागण होत असून, या रोगाच्या उपचारासाठी ‘लिपोझोमल ऑफोटेरीसीन बी’ हे इंजेक्शने गरजेचे आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी वारजे-माळवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
रवींद्र माने (वय ३५, रा. शिवणे), अनिकेत रसाळ ऊर्फ सागर (वय २१, रा. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ४१ वर्षीय अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकाने फिर्याद दिली. १४ जूनला १२ च्या सुमारास कर्वेनगर परिसरात ही घटना घडली.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर म्युकरमायकोसिस या रोगाची लागण होत आहे. या रोगाच्या उपचारासाठी रुग्णांना ‘लिपोझोमल ऑफोटेरीसीन बी’ हे इंजेक्शन आवश्यक असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी संगनमताने ७ हजार ४०० रुपयांच्या इंजेक्शनची २० हजार ५०० रुपयांना विक्री केली. तसेच विनाबिल आणि डॉक्टराच्या चिठ्ठीशिवाय इंजेक्शनची विक्री करून शासन आणि नागरिकांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता विविध तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.