कर्डे दरोड्यातील दोघांना अटक
By admin | Published: June 16, 2016 04:13 AM2016-06-16T04:13:05+5:302016-06-16T04:13:05+5:30
सहा महिन्यांपूर्वी कर्डे (ता. शिरूर) येथील दावल मलिक वस्तीवर झालेल्या खुनासह दरोडा या गुन्ह्यातील सहापैकी दोन आरोपींना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या
शिरूर/ लोणी काळभोर : सहा महिन्यांपूर्वी कर्डे (ता. शिरूर) येथील दावल मलिक वस्तीवर झालेल्या खुनासह दरोडा या गुन्ह्यातील सहापैकी दोन आरोपींना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे. उर्वरित चार आरोपींना लवकरच अटक करू, असा विश्वास पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी व्यक्त केला.
या संदर्भात बाळू प्रभाकर चव्हाण (वय २५) व अमोल दुर्योधन ऊर्फ दुर्या काळे (वय २३, दोघेही राहणार खोकडमळा, आलेगाव पागा, ता. शिरूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
५ डिसेंबर २०१५ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सहा अज्ञात आरोपींनी मच्छिंद्र रामभाऊ बांदल (वय ४५) यांच्या घरी दरोडा टाकला होता. मच्छिंद्र बांदल, त्यांची पत्नी शारदा (वय ४०) व मुले दीपक व नवनाथ (वय १९) या चौघांना कोयता, चाकू, लाकडी दांडके व सुरा यांच्या साहाय्याने दमदाटी करून जबरदस्त मारहाण केली होती. तसेच घरातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ८७ हजार ७० रुपयांचा किमती ऐवज चोरून नेला होता. मच्छिंद्र बांदल यांच्या डोक्याच्या कवटीला गंभीर मार लागल्याने ते आठ दिवस बेशुद्धावस्थेत होते. १२ डिसेंबर रोजी ते मरण पावले. परिसरातील नागरिकांनी शिरूर चौफुला येथे रास्ता रोको आंदोलनही केले होते. (वार्ताहर)
असा लागला तपास
कुठलाच पुरावा नसल्याने या पोलीस पथकाने पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये जोरदार तपास केला. त्या वेळी बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, आलेगाव पागा येथील घरफोडी करणारे दोघेजण कामधंदा न करता दारू व गांजा पिऊन दररोज मौजमजा करत आहेत. पोलीस पथकाने भिक्षेकरी, फेरीवाला, कपडेविक्रेता, शेतकरी असे वेगवेगळे वेषांतर करून या दोघांची माहिती गोळा केली. त्या वेळी या दोघांकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्यांचे फोटो मिळवून फिर्यादी शारदा बांदल यांना दाखवले असता या दोघांना ओळखले. त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचे
चार साथीदारही निष्पन्न झाले असून, लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती
राम जाधव यांनी दिली.