बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; नांदेड सिटी पोलिसांकडून दोन गावठी पिस्तूल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:29 IST2024-12-21T12:29:39+5:302024-12-21T12:29:39+5:30
खबऱ्यामार्फत सराईत गुन्हेगार साजन शहा व कुणाल पुरी यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली.

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; नांदेड सिटी पोलिसांकडून दोन गावठी पिस्तूल जप्त
पुणे : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतासह दोघांना नांदेड सिटी पोलिसांच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्या झडतीत पोलिसांनी दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. साजन विनोद शहा (वय १९, रा. धायरीगाव, भैरवनाथ, धायरी) आणि कुणाल शिवाजी पुरी (वय १८, रा. विश्व कार्नर, भैरवनाथ मंदिराजवळ, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या पथकातील कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला आणि योगेश झेंडे यांना खबऱ्यामार्फत सराईत गुन्हेगार साजन शहा व कुणाल पुरी यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. तसेच ते धायरी येथील अंबाईदरा येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली.
त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यात अटक करण्यात आलेल्या साजन शहा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारीचे सहा गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, अंमलदार राजू वेंगरे, अक्षय जाधव आणि प्रशांत काकडे यांच्या पथकाने केली.