निष्क्रिय बँक खाते घोटाळ्यात हैदराबादेतून दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:12 AM2021-03-21T04:12:04+5:302021-03-21T04:12:04+5:30

सुधीर भटेवरा फरार : २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नामांकीत बँकेमधील डॉरमेंट (निष्क्रिय) खात्याच्या डेटा ...

Two arrested from Hyderabad in inactive bank account scam | निष्क्रिय बँक खाते घोटाळ्यात हैदराबादेतून दोघांना अटक

निष्क्रिय बँक खाते घोटाळ्यात हैदराबादेतून दोघांना अटक

Next

सुधीर भटेवरा फरार : २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नामांकीत बँकेमधील डॉरमेंट (निष्क्रिय) खात्याच्या डेटा प्रकरणात सायबर पोलिसांनी हैदराबादहून आणखी दोघांना अटक केली. पुण्यातील ज्याच्या घरासमोर पोलिसांनी २५ लाखांसह तिघांना पकडले होते तो घरमालक सुधीर भटेवरा हा फरार झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

लक्ष्मीनारायण गुट्टू ऊर्फ सोन्या (वय ३२, रा. बौद्धनगर, हैदराबाद) आणि व्यंकटेश सुब्रम्हण्यम उपाला (वय ४०, रा. भांदलागुंडा, नागोल, हैदराबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी अनघा मोडक हिच्या मोबाईल फोनच्या माहितीचे विश्लेषण केले असता त्यातील संभाषणात सर्व आरोपींचा उल्लेख व त्यांच्याशी बोलणे झाल्याचे आढळून आले आहे. रोहन मंकणी, राजेश शर्मा, परमजितसिंग संधु आणि अनघा मोडक हे सर्व जण १० व १२ मार्च रोजी नवी पेठेतील सॅफरॉन हॉटेलमध्ये एकत्र आले होते. त्यांनी तेथे बराच वेळ थांबून चर्चा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली त्याची माहिती घ्यायची आहे.

अनघा मोडक हिच्या घराची तसेच कार्यालयाची झडती घेण्यात आली असून दोन्ही ठिकाणांवरुन ७ हार्ड डिस्क व एक टॅब जप्त करण्यात आला आहे. या लॅपटॉपचा तिने गुन्ह्यासाठी वापर केला आहे का याचा तपास करायचा आहे. या गुन्ह्यात एका बँकेतील एक खाते व दुसऱ्या बँकेतील ३ खात्यांची माहिती संबधित बँकेने सादर केली असून त्या खात्यांमध्ये २०९ कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. या खात्यातील पैसे आरोपी हे कोणत्या प्रकारे हॅक करुन त्यातील रक्कम ही एका बँक खात्याव्यतिरिक्त अन्य कोणत्या खात्यावर कशा प्रकारे ट्रांन्सफर करणार होते, याचा तपास करायचा आहे.

रवींद्र माशाळकर यांच्या लातूर येथील घराची झडती घेण्यात आली असून घरातून एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. हैदराबाद येथील आरोपी इतरांशी कशाप्रकारे संपर्कात होते, याचा तपास करायचा आहे. लक्ष्मीनारायण गुट्टू याने राजशेखर ममीडी (रा. हैदराबाद) यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर २५ कोटी ७७ लाख ७८ हजार ९०८ रुपये तसेच दुसऱ्या व्हॉटसअ‍ॅपवर ३ कोटी ५ लाख ६० हजार ३५५ रुपयांची शिल्लक असलेल्या खात्यांची माहिती पाठविल्याचे आढळले आहे. त्याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा असल्याची माहिती सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने सर्वांना २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

चौकट

३ खात्यात २०९ कोटीची माहिती समोर

गुट्टूने राजशेखरला पाठविली होती २५ कोटी ७७ लाख व ३ कोटी ५ लाख रुपये शिल्लक असलेल्या खात्यांची माहिती

चौकट

सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय ५४, रा. आनंदनगर, सिंहगड रोड) याला पोलिसांनी पकडल्यानंतर नोटीस देऊन परत पाठविले होते. मात्र, आता पोलीस त्याच्याकडे चौकशीसाठी गेले असताना तो घरी मिळून आला नाही. तो पळून गेल्याने पोलिसांनी तो फरार असल्याचे न्यायालयात सांगितले.

Web Title: Two arrested from Hyderabad in inactive bank account scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.