प्रवासादरम्यान रिक्षा जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:04+5:302021-04-29T04:08:04+5:30
पुणे : प्रवासी म्हणून रिक्षा बसून मुंढवा परिसरात नेऊन दगडाने मारहाण करण्याचा धाक दाखवून ८० हजार रुपयांची रिक्षा चोरुन ...
पुणे : प्रवासी म्हणून रिक्षा बसून मुंढवा परिसरात नेऊन दगडाने मारहाण करण्याचा धाक दाखवून ८० हजार रुपयांची रिक्षा चोरुन नेणार्या दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.
विशाल दिलीप करपते (वय २१) आणि विकी गोपाल बुरघाटे (वय २५, दोघेही रा. हांडेवाडी रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुणाल अग्रवाल (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
कुणाल हे पुणे रेल्वे स्टेशनच्या गेट नं. ४ येथे २७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता प्रवाशांची वाट पहात थांबले होते. विशाल व विकी हे कुणाल यांच्या रिक्षांमध्ये बसले. त्यांनी हडपसर येथील ससाणेनगर येथे जायचे आहे, असे सांगितले. कुणाल यांनी त्यांचा मित्र सचिन पाटील यांनाही बरोबर घेतले. त्यानुसार ते मुंढवा येथील वाडेकर वस्तीजवळ आले असताना त्यांना या दोघांनी रिक्षा थांबवायला सांगितले. त्यानंतर त्यांनी दगडाने मारण्याचा धाक दाखवून रिक्षा जबरदस्तीने पळवून नेली होती. कुणाल यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन या घटनेची माहिती व रिक्षा नंबर दिला. त्यानुसार पोलिसांनी तातडीने रिक्षाचा शोध घेऊन दोघांना अटक केली आहे.