मंत्रालयाबाहेर आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक, मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:02+5:302021-08-24T04:14:02+5:30
जाधववाडी-रांजणी येथील शेतकरी सुभाष जाधव यांनी मंत्रालयाबाहेर शुक्रवारी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचार सुरू असताना मुंबईतील रुग्णालयात ...
जाधववाडी-रांजणी येथील शेतकरी सुभाष जाधव यांनी मंत्रालयाबाहेर शुक्रवारी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचार सुरू असताना मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक सतीश होडगर म्हणाले की, मयत शेतकरी सुभाष सोपान जाधव व विलास सहादू शिंदे यांच्यामध्ये जमिनीच्या कारणावरून आपापसांत वाद होते. परस्परविरोधी आलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच न्यायालयातही प्रकरण प्रलंबित आहे. मयत शेतकरी सुभाष जाधव यांचा मुलगा गणेश जाधव याने मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर गुन्ह्यांची कागदपत्रे आज मंचर पोलीस ठाण्यास प्राप्त झाली. त्यानंतर विलास सहादू शिंदे व इतर यांच्या विरोधात सुभाष जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिंदे यांच्यावर सावकारीचा गुन्हाही दाखल झाला आहे. यातील विलास शिंदे व कैलास शिंदे या दोघांना अटक केल्याची माहिती होडगर यांनी दिली.दरम्यान, शेतकरी सुभाष जाधव याच्यावर सकाळी साडेनऊ वाजता जाधववाडी रांजणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.