सुपारी घेणाऱ्यांना पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:16 AM2021-09-15T04:16:08+5:302021-09-15T04:16:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खुनाची सुपारी घेणाऱ्यांना पिस्तुलांची विक्री करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी अटक केली. राजू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाची सुपारी घेणाऱ्यांना पिस्तुलांची विक्री करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी अटक केली. राजू अशोक जाधव व प्रमोद उर्फ बारक्या श्रीकांत पारसे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना विक्री केलेल्या शस्त्राचा वापर करून, मोहम्मदवाडी येथे एका वाळू विक्रेत्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, तसेच वेल्हा तालुक्यातील दापोडे येथील व्यावसायिकावरही गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले ३ गावठी कट्टे ते कोणाला देण्यासाठी आले होते किंवा त्यांनी कोणाची खुनाची सुपारी घेतली होती का, याचा तपास वानवडी पोलीस करीत आहेत.
सुपारी घेऊन अग्निशस्त्राने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना यापूर्वी अटक झाली होती. दोघेही सध्या तात्पुरत्या जामिनावर कारागृहातून बाहेर आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वानवडी पोलिसांचे तपास पथक गस्तीवर असताना पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख यांना बातमी मिळाली होती की, सराईत गुन्हेगार जाधव व पारसे हे दोघे काळेपडळ भागात आले असून, त्यांच्याकडे पिस्तुले आहेत. त्यानुसार, पथकाने छापा टाकून पारसे याला पकडून एक गावठी कट्टा जप्त केला. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. अधिक तपास केला असता, जाधव याच्याकडून दोन गावठी कट्टे पोलिसांनी जप्त केले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयंत जाधव कर्मचारी संतोष तानवडे, राजू रासगे, संतोष मोहिते, विनोद भंडलकर, संतोष नाईक, अतुल गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
......
लोणंदच्या दरोड्याचा छडा
जाधव आणि पारसे यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी लोणंद एमआयडीसी येथील एका कंपनीत टाकलेल्या दरोड्याची कबुली दिली आहे. दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांना सोबत घेऊन हा दरोडा टाकला होता. कंपनीतील ५ लाखांची कॅश लुटल्याचे आरोपीनी पोलिसांना सांगितले. यावेळी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाइल जप्त करण्यात आला आहे.