१ लाखांची लाच घेणाऱ्या सहाय्यक निरीक्षकासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 10:59 PM2021-09-08T22:59:36+5:302021-09-08T23:00:12+5:30

२ कोटी ७५ लाखांच्या फसवणुकीचे प्रकरण; न्यायालयातूनच पोलीस अधिकाऱ्याला घेतले ताब्यात

Two arrested for taking Rs 1 lakh bribe pune court | १ लाखांची लाच घेणाऱ्या सहाय्यक निरीक्षकासह दोघांना अटक

संग्रहित छायाचित्र

Next
ठळक मुद्दे२ कोटी ७५ लाखांच्या फसवणुकीचे प्रकरण; न्यायालयातूनच पोलीस अधिकाऱ्याला घेतले ताब्यात

पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी ५ लाखांची मागणी करुन त्यापैकी १ लाख रुपये स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील (वय ३३) आणि खासगी व्यक्ती संतोष भाऊराव खांदवे (वय ४५, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, ही सापळा कारवाई झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाला तेथूनच ताब्यात घेतले.

तक्रारदार यांच्या वडिलांवर विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये जामीन मिळण्यास मदत होईल यासाठी तपासात आवश्यक ती मदत करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. या तक्रारीची पडताळणी ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यात तडजोडीअंती ३ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लोहगाव येथे सापळा आयोजित केला. तेथे खासगी व्यक्ती संतोष खांदवे याने तक्रारदाराकडून १ लाख रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील हे शिवाजीनगर न्यायालयात होते. सापळा कारवाई यशस्वी झाल्याचे समजताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयातून राहुल पाटील यांना ताब्यात घेतले. दोघांवरही विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये १ सप्टेंबर रोजी २ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लोहगाव येथील जमिनीचे प्लॉटिंग करुन देण्यासाठी १६ एकर जमीन मिळवून देतो, असे सांगून दोघांनी २ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणात विमानतळ पोलिसांनी दोघांनाही ३ सप्टेंबर रोजी अटक केली. त्यांना ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. 

न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी लाचे मागण्यात आली. त्यातील एका आरोपीकडून ४५ लाख रुपये मिळाल्याचे फिर्यादीने लिहून दिले आहे. त्याच्याकडून फिर्यादीला १ कोटी ४५ लाख रुपये येणे होते. तर उर्वरित रक्कम १ कोटी ३० लाख रुपये दुसर्या तक्रारदाराच्या वडिलांकडून येणे होते. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांना जामीन नामंजूर केला. त्याचवेळी लोहगावमध्ये ही कारवाई झाली आणि लाच लुचपतने न्यायालयातून सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांना ताब्यात घेतले.

Web Title: Two arrested for taking Rs 1 lakh bribe pune court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.