काळ्या बाजारात रेमडेसिविर विकणाऱ्या दोघा भावांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:56+5:302021-04-18T04:09:56+5:30
पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या दोघा भावांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन आणि ...
पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या दोघा भावांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन आणि दुचाकी जप्त कली आहे.
प्रदीप देवदत्त लाटे (वय २५) आणि संदीप देवदत्त लाटे (वय २३, रा. बालेवाडी, मूळ रा. बेलुरा, जि़. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बालेवाडी भागात ही कारवाई करण्यात आली.
बालेवाडी परिसरात एक जण रेमडेसिविर इंजेक्शन २५ हजार रुपयांना विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल आणि पथकाने बालेवाडी भागात सापळा लावला. त्यात प्रदीप लाटे याला पकडण्यात आले. त्याचा भाऊ संदीप लाटे हा त्यास औषधांबाबत व वितरकांबाबत असलेल्या ज्ञानाचा गैरवापर करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्यालाही अटक करण्यात आली. औषध निरीक्षक जयश्री सवदती यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शहरात रेमडेसिविरची काळ्या बाजारात विक्री करण्यात येत असल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार १० पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत ५ गुन्हे दाखल करून ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ९ इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे. या कारवाईसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून सहकार्य करण्यात आले.
.......
शहरात रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री होत असल्यास नागरिकांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.