दोन बायपास... साडेसतरा स्कोअर... तरीही केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:44+5:302021-05-07T04:12:44+5:30
सतीश गावडे लोकमात न्यूज नेटवर्क माळेगाव : माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील पैलवान दादासो बडे (वय ...
सतीश गावडे
लोकमात न्यूज नेटवर्क
माळेगाव : माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील पैलवान दादासो बडे (वय ७४) यांची दोन वेळा बायपास झाली. कोरोनापासून वाचण्यासाठी त्यांनी काळजी घेतली. मात्र, कोरोनाने त्यांना गाठलेच. त्यांचा सीटी स्कोअर हा १७.५० होता. घरचे चिंतीत होते. मात्र, आखाड्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या व अनेक नामवंत मल्लांना धूळ चारणाऱ्या बडे यांनी कोरोनालाही अवघ्या आठ दिवसांत हरवले. ते उपचारानंतर कोरोनावर मात करून घरी परतल्याने कुटुंबाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. खरे तर दादासो बडे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरसुध्दा अचंबित झाले आहेत. कारण जिथं रुग्ण बचावण्याची शक्यता कमी असताना रुग्णाच्या आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा उभारी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दादासो बडे हा एक रांगडा पैलवान. अनेक कुस्त्यांचे फड गाजवून पंचक्रोशीत दबदबा निर्माण केलेले व्यक्तिमत्त्व. आपल्या पत्नीसह दुग्ध व्यवसाय करुन ते उपजीविका करतात. दोन मुलांना चांगले शिक्षण देऊन ती मुले नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी स्थायिक झाली आहेत.
आयुष्याचा गाडा हाकताना दोनदा बायपास झाली. मात्र प्रचंड कष्ट, संकटाला सामोरे जाण्याची क्षमता आदी अडचणींवर मात करून दुग्ध व्यवसाय चालू ठेवला. काही दिवसांपूर्वी डेंग्यूचा आजार झाला. त्यावरही मात केली. मात्र पुन्हा तब्येत अचानक बिघडली. तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. सोबत न्यूमोनियादेखील झाला होता.
बारामती डाॅ. गोकुळ काळेच्या हाॅस्पिटलमधे दाखल केले. कुटुंबाकडून माहिती घेतल्यावर यापूर्वी झालेले आजार पाहून रुग्णांवर उपचार कसा करावा या चिंतेत ते होते. शिवाय व्हेंटिलेटर देखील लागण्याची गरज आहे असे सांगितल्यावर कुटुंब देखील चिंतेत पडले. या सर्व घडामोडी घडत असताना पैलवान बडे मात्र निर्धास्त होते. मला काय होणार नाही, मी आजाराला घाबरत नाही, डॉक्टर तुम्ही उपचार करा असे सांगणारे पैलवान बडे आठ दिवसांतच ठणठणीत बरे झाले. या आठ दिवसांत डॉक्टरांनी मेहनत घेतली. पैलवान बडेंच्या कुटुंबाकडून योग्य काळजी घेतली गेली.
दरम्यान, कोरोनामुळे अनेक जण दगावले. त्यास भीती हे मुख्य कारण होते. अनेक आजार असताना पैलवान दादासो बडे यांनी कोरोनावर मात केली, याची प्रेरणा इतरांनी घेऊन कोरोनाचा सामना करावा.
चौकट-
1) मी कोरोनाची भीती बाळगली नाही. योग्य आहार घेतला. पैलवानकीचे शरीर आहे. काय होणार नाही हा विश्वास होता. जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती व ऊर्मी होती. त्यामुळे कोरोनाला हरवून जीवनाची कुस्ती पुन्हा जिंकली.
पैलवान दादासो बडे- माळेगाव खुर्द
2) खरे तर पैलवान बडे यांची प्रकृती चिंताजनक होती. दोन वेळा बायपास व साडेसतरा स्कोअर यामुळे रुग्ण जगतोय की नाही याची शाश्वती देता येत नव्हती. मात्र त्यांच्याकडे असलेली जीवन जगण्याची प्रेरणा, आत्मविश्वास, संकटाला सामोरे जाण्याची वृत्ती भीती न बाळगणे आदी गुणांमुळे त्यांनी कोरोनावर मात केली. आम्हीदेखील आश्चर्यचकित आहोत.
डाॅ.गोकुळ काळे- बारामती
3) आमचे वडिल जगतात की मरतात याची आम्हाला मोठी चिंता होती.मात्र वडिलांच्या अंगी असलेली जिद्द व खंबीरपणा व डॉक्टर यांनी केलेले उपचार यामुळे आमच्या वडिलांचा पुर्नजन्मचं म्हणावा लागेल.
ज्ञानादेव बडे(मुलगा)- पुणे शहर पोलीस
फोटो- पैलवान दादासो निवृत्ती बडे