जम्बो कोविड सेंटरसाठी दोन 'कार्डियाक' रुग्णवाहिका; २४ तास उपलब्ध ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:27 PM2020-09-06T12:27:57+5:302020-09-06T12:28:12+5:30
करारनामा आणि निविदेतील अटी व शर्तीनुसार कारवाई करण्याचे पीएमआरडीएला पत्र
पुणे : जम्बो कोविड सेंटरचे नियंत्रण महापालिकेकडे देण्यात आल्यानंतर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पालिकेने आवश्यकता लक्षात घेत दोन कर्डीऍक रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या आहेत. या दोन्ही रुग्णवाहिका २४ तास जम्बोच्या आवारात उभ्या राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली
'कार्डियाक' रुग्णवाहिका न मिळाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांना प्राण गमवावे लागले होते. यासोबतच अनेक अत्यवस्थ रुग्णांना ही रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. या रुग्णवाहिकेची आवश्यकता लक्षात घेता याठिकाणी दोन कर्डीऍक रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईवरून विशेष विनंती करून १०८ ची कर्डीऍक रुग्णवाहिका उपलब्ध करून घेण्यात आली आहे. या दोन्ही रुग्णवाहिका २४ तास जम्बोच्या आवारात तैनात असणार आहेत. जम्बो कोविड सेंटर उभे करताना रुग्णांना औषधोपचार मोफत देण्याचे ठरले होते. परंतु, रेमीडिसिव्हर इंजेक्शन लागल्यास ते मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी आणावे असे निकष ठरले होते. परंतु, सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे इंजेक्शन तूर्तास पालिकेकडून रुग्णांना मोफत दिले जाणार आहे. सध्या कोणताही नवीन रुग्ण दाखल करून घेतला जात नाही. नवीन रुग्ण येण्यास सुरुवात झाल्यावर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
पालिकेने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला जम्बो रुग्णालयात झालेल्या हलगर्जीपणाबाबत कडक कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. करारनामा आणि निविदेतील अटी व शर्तींनुसार कारवाई करण्यात यावी असे पालिकेने पीएमारडीएला कळविले आहे.
पोलीस बंदोबस्ताची मागणी शनिवारी काही रुग्णांचे नातेवाईक आक्रमक झाले होते. नातेवाईकांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत भांडणे केली. त्यामुळे याठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवावा अशी विनंती पालिका आयुक्तांकडून पोलीस आयुक्तांना करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींमुळे डॉक्टरही घाबरलेले आहेत.
सध्या नातेवाईकांची सर्वात मोठी तक्रार आहे ती रूग्णांची माहिती न मिळण्याची. जम्बोमधील फोनवर संपर्क साधला तरीसुद्धा रुग्णाबद्दल माहिती मिळत नाही. त्यावर पालिकेने उपाय शोधला असून प्रत्येक खाटेजवळ विद्युत कनेक्शन दिले जाणार आहे. याठिकाणी रुग्ण आपला मोबाईल चार्जिंग करू शकणार आहेत. त्यामुळे मोबाईलवरून रुग्ण थेट नातेवाईकांशी बोलू शकतील. वास्तविक ही व्यवस्था रुग्णालय उभारतानाच करायला हवी होती. परंतु, पीएमआरडीएचे या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले.