पती-पत्नीच्या भांडणात आईला वाचवताना दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 09:32 AM2021-05-29T09:32:46+5:302021-05-29T09:36:19+5:30
खाणीत उडी घेत आईने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
बारामती/पुणे - पतीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून गावाबाहेर असणाऱ्या खाणीत साठलेल्या पाण्यात उडी घेतलेल्या आईला वाचवताना दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपळी (ता. बारामती ) येथे हि घटना घडली. या घटनेत ज्या आईला वाचवण्यासाठी मुलांनी पाण्यात उडी घेतली, त्या आईला मात्र पतीने सुखरूप बाहेर काढले आहे.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यानुसार पती-पत्नीच्या भांडणातून रागाच्या भरात हि घटना घडली आहे. शनिवारी (दि 29) पहाटे तीन च्या सुमारास हि घटना घडली. पहाटे येथील अतुल सूर्यवंशी आणि अंजली सूर्यवंशी (दोघे रा.पिंपळी, ता. बारामती ) या पती पत्नी मध्ये भांडण झाले. त्यामुळे विवाहिता रागाच्या भरात आत्महत्या करण्याचा निर्णय घेत पिंपळी येथील खाणीच्या पाण्याच्या दिशेने निघाली. खाणीच्या ठिकाणी पोहचल्यावर रागात विवाहितेने खाणीच्या पाण्यात उडी देखील मारली. मात्र, याच वेळी आईला पाहण्यासाठी त्यांची दोन मुले दिव्या (वय 4) व शौर्य (वय 2)हे दोघे पाठोपाठ आले होते. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात ही दोन्ही मुले एकापाठोपाठ पाण्यात पडली.
याचवेळी पती अतुल यांनी पत्नीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेत तिला पाण्याबाहेर काढले. पण या तणावात दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुले लहान असल्याने त्यांना वाचविण्याची संधी मिळाली नाही. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेनंतर या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह घटनेनंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन चिमुकल्यांचा झालेला शेवट आज अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.