शिरुर तालुक्यात झोपडीला लागलेल्या अचानक आगीत दोन लहान मुलांसह एकाचा दुर्देवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 07:01 PM2019-04-29T19:01:38+5:302019-04-29T19:03:07+5:30
झोपडीला अचानक लागलेल्या आगीमध्ये दोन लहान मुलांसह एकाचा जळुन दुर्देवी मृत्यू झाला.
शिरुर (टाकळी हाजी) : शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे झोपडीला अचानक लागलेल्या आगीमध्ये दोन लहान मुलांसह एकाचा जळुन दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना घटना घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदाबाद गावापासुन एक किलोमीटर अंतरावर आदिवासी भिल्ल समाजाची ३५ घरांची वस्ती असून अनेकांची घरे छपरांची व ऊसाच्या पाचटाने शेकरलेली आहे. सोमवारी (दि. २९) दुपारी चार च्या दरम्यान अचानक लालु आनंदा गावडे यांच्या घराला आग लागली. घरामध्ये दोन लहान मुले झोपली होती. त्यांना वाचवायला घरात घुसलेल्या लालु यांना धुर व आगीमुळे त्या चिमुरडयांना घेऊन बाहेरचं पडता आले नाही. त्यामधे लालू आनंदा गावडे (वय ३५)यांच्यासह त्यांचा मुलगा दादू लालु गावडे वय (साडेतीन वर्षे), त्यांच्या मेहुण्यांची मुलगी प्राजु अरुण पवार (वय अडीच वर्ष ), हे तिघे जागीच जळुन खाक झाले. तर पत्नी उषाबाई लालू गावडे , अरूण फक्कड पवार, बारकुबाई फक्कड पवार हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तत्काळ रूग्णालयात पाठविण्यात आले. या आगीत शेजारी असलेल्या चार झोपडया व त्यांच्या संसार उपयोगी वस्तु जळुन गेल्या आहेत. उषाबाई हिला एक मुलगा व चार मुली आहेत.
सरपंच योगेश थोरात यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. आग विझविण्यासाठी अग्निशामक यंत्रना तत्काळ दाखल झाली. शिरूर चे माजी आमदार पोपटराव गावडे, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, गटविकास अधिकारी संदीप जठार, घोडगंगाचे संचालक रंगनाथ थोरात, पंचायत समितीचे सदस्य सुभाष पोकळे यांनी भेट दिली.
या आदिवासींसाठी एका कंपनीने ३५ घरकुल बांधुन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागा गायरान जमीन असुन, शिरुरच्या भूमिअभिलेख अधिकारी अनेक वेळा हेलपाटे घालुन सुद्धा योग्य सहकार्य करत नसल्याने, घरकुले बांधण्यात विलंब झाला आहे. जर पक्के घरे अस्तित्वात असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे माजी सरपंच योगेश थोरात यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.