उघड्या विद्युत वाहिनीचा स्पार्क होऊन दोन मुले भाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:44 AM2018-04-25T05:44:45+5:302018-04-25T05:44:45+5:30
वायरिंगचे शॉर्ट सर्किट शनिवारी सकाळपासूनच सुरू होते़ वायरिंगमधून धूरही येत होता़ लोकांनी संबंधित ठेकेदाराला फोन करून याची माहिती दिली होती़
पुणे/आंबेगाव पठार : आंबेगाव पठार येथील होळकरनगरमध्ये रस्त्याचे काम सुरू असताना उघड्या ठेवलेल्या विद्युत वाहिनीचा स्पार्क होऊन त्यात दोन लहान मुले भाजून जखमी झाली़ या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ठेकेदार सनराज कन्स्ट्रक्शनचे मालक संदीप हनमघर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
याप्रकरणी जालिंदर सुळे (वय ३८, रा़ होळकरनगर, आंबेगाव पठार) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की आंबेगाव पठार येथील होळकरनगरमध्ये अंतर्गत रस्त्याच्या खोदाईचे काम शनिवारी सुरू होते़ त्यात महावितरणची केबल उघडी ठेवली होती़ रात्री साडेनऊला त्यातून स्पार्किंग होऊन त्यात सुळे यांची मुलगी तेजस्वी हिचे दोन्ही पाय व दोन्ही हात कोपऱ्यापर्यंत भाजले़ तसेच त्यांच्या समोरील इमारतीत राहणारे सागर कोळेकर यांचा मुलगा श्रीहान (वय ९) याच्या दोन्ही पाय मांडीपर्यंत व डाव्या हाताला भाजले़ त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले़ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले व सहकाºयांनी घटनास्थळी भेट दिली़ श्रीहानचे वडील सागर कोळेकर हे खासगी कंपनीत कामाला असून तीन ते चार महिन्यांपासून या ठिकाणी रहायला आले आहेत़ जालिंदर सुळे यांचा मालवाहतुकीचा टेम्पो खासगी व्यवसाय करत आहेत. वायरिंगचे शॉर्ट सर्किट शनिवारी सकाळपासूनच सुरू होते़ वायरिंगमधून धूरही येत होता़ लोकांनी संबंधित ठेकेदाराला फोन करून याची माहिती दिली होती़ महावितरणनेही वेळेत दुरुस्ती केली नाही़ वेळीच दुरुस्ती केली असती तर हा अपघात टाळता आला असता, असे तेजस्वीची आजी रंजना सुळे यांनी सांगितले़