बारामती तालुक्यात सशाची शिकार केल्याप्रकरणी दोन महाविद्यालयीन युवकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 12:52 PM2020-04-29T12:52:28+5:302020-04-29T12:59:23+5:30
स्थानिक जागरूक ग्रामस्थांनी याबाबत वन विभागाला माहिती कळविल्याने हा प्रकार उघड..
बारामती : उंडवडी (ता.बारामती ) येथे सशाची शिकार केल्याप्रकरणी दोघा युवकांना वन विभागाने अटक केली आहे .स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून मंगळवारी (दि २८) दुपारी वन विभागाने छापा टाकून या दोघांना खासगी शेतात रंगेहाथ पकडले .
वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी ' लोकमत ' शी बोलताना याबाबत माहिती दिली .काळे यांनी संगीतले की , वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२अन्वये सशाची शिकार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .किरण कुचेकर , दिपक कुचेकर या दोघांना अटक करून वन विभागाच्या कस्टडीत ठेवण्यात आले आहे .बुधवारी (दि २९) दुपारी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे .स्थानिक जागरूक ग्रामस्थांनी याबाबत वन विभागाला माहिती कळविल्याने हा प्रकार उघड झाला .वन विभागाने दोघाना शिकारीसह रंगेहाथ पकडल्याचे काळे यांनी संगितले .शिकार प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का , अगोदर काही शिकारीचे प्रकार घडले आहेत का , तसेच शिकार केलेल्या प्राण्याची विक्री होते का , याबाबत तपास करणार आहे .शिकार केल्याचे सिद्ध झाल्यास ३ते ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते , असे देखील काळे यांनी संगितले .
वनपरीक्षेत्र अधिकारी काळे यांच्यासह वनपाल पी. जी. जराड , वनरक्षक मीनाक्षी गुरव , ए. बी. पाचपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली . अटक करण्यात आलेले दोघे महाविद्यालयीन युवक आहेत .