Pune: हौसेसाठी पिस्तुल बाळगणारे दोन व्यावसायिक पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 02:00 PM2021-12-09T14:00:40+5:302021-12-09T14:10:44+5:30
पुणे : सुमारे दीड वर्षापूर्वी खून झालेल्या गुन्हेगाराकडून हौसेपोटी पिस्तुल घेऊन ते राजरोजपणे मिरविणाऱ्या दोघे व्यावसायिक ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ...
पुणे: सुमारे दीड वर्षापूर्वी खून झालेल्या गुन्हेगाराकडून हौसेपोटी पिस्तुल घेऊन ते राजरोजपणे मिरविणाऱ्या दोघे व्यावसायिक ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. खेड शिवापूर येथे आलेल्या दोघा व्यावसायिकांकडून पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ गावठी पिस्तुल आणि ४ जीवंत काडतुसे असा १ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. संतोष अंकुश डिंबळे (वय २१, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) आणि उमेश दिलीप वाव्हळ (वय २५, रा. बांडेवाडी, खेड शिवापूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
संतोष डिंबळे याचे कात्रज येथील खाऊ गल्लीत व्यवसाय आहे. तर उमेश वाव्हळ याचे नसरापूरला दुकान आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्राण येवले यांनी पुणे सातारा रोडवरील कोंढणपूर चौकातील महामार्गावरील पुलाखाली दोघे जण संशयास्परित्या थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोघांच्या कमरेला प्रत्येकी १ गावठी पिस्तुल व मॅगझिन व त्यामध्ये प्रत्येकी २ जिवंत काडतुसे असे २ पिस्तुले व ४ जिवंत काडतुसे असा १ लाख ४०० रुपयांचा माल मिळून आला.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना ही पिस्तुले प्रविण मोरे (रा. शिवरे ता. भोर) याने ठेवायला दिली असल्याचे सांगितले आहे. प्रविण मोरे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल होता. कोरोनामुळे पॅरोलवर तो कारागृहातून बाहेर आल्यावर त्याचा जुलै २०२० मध्ये चौघांनी कोयत्याने वार करुन खून केला होता. पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस अंमलदार प्रकाश वाघमारे, अमोल शेडगे, प्राण येवले या पथकाने ही कामगिरी केली आहे.