Pune: एकाच मंडल अधिकाऱ्याविषयी लाच लुचपतकडे एकाचवेळी दोन तक्रारी, एकावर कारवाई
By विवेक भुसे | Published: April 1, 2024 03:46 PM2024-04-01T15:46:28+5:302024-04-01T15:47:00+5:30
लाचेची मागणी केली गेली असल्याने कार्यालयात काम करणाऱ्या खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुणे : शेतजमीनीच्या ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या दोन तक्रारी थेऊर येथील मंडल अधिकाऱ्याविरोधात आल्याचे समोर आले आहे. एका तक्रारीनुसार १० हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे दुसऱ्या तक्रारीमध्ये सापळा कारवाई होऊ शकली नाही. मात्र लाचेची मागणी केली गेली असल्याने कार्यालयात काम करणाऱ्या खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही तक्रारी कोलवडी गावातील होत्या.
मंडल अधिकारी जयश्री कवडे (रा. थेऊर, ता. हवेली), खासगी संगणक ऑपरेटर योगेश कांताराम तातळे (वय २२, रा. दिघी) आणि एजंट विजय सुदाम नाईकनवरे (वय ३८, रा. नागपूर चाळ, येरवडा) अशी यापूर्वी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यातील आजीच्या वडिलांचे नाव कमी झाल्याचे फिर्यादी यांना दिसून आले होते. ते नाव पुन्हा लावण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. तहसीलदारांनी नाव पुन्हा लावण्याचे आदेश दिले होते.
तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नांदीप्रमाणे नोंदी घेण्यासाठी फिर्यादी मंडल अधिकारी जयश्री कवडे यांना भेटले. त्यांनी खासगी व्यक्ती विजय नाईकनवरे याला भेटण्यास सांगितले. त्यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १२ मार्च रोजी सापळा रचून थेऊर मंडल अधिकारी कार्यालयात लाच घेताना पकडले. तिघांविरुद्ध लाेणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसर्या प्रकरणात तक्रारदार यांनी कोलवडी येथील जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीची ७/१२ उतार्याची नोंद, फेरफार मंजुर करण्यासाठी थेऊर मंडल अधिकार्याकडे अर्ज केला होता. तेथे काम करणारा विजय नाईकनवरे याने तक्रारदारांकडे ८० हजार रुपयांची मागणी केली होती. त्याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली. त्याची पडताळणी १५ फेब्रुवारी व २८ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीत प्रत्यक्ष सापळा कारवाई पूर्ण होण्यापूर्वीच दुसर्या तक्रारीत विजय नाईकनवरे याच्यासह मंडल अधिकार्यावर कारवाई करण्यात आली होती. लाचेची मागणी केली गेली असल्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.