पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहनांसाठी दोन कोटींचा निधी; २०० जागांसाठी होणार भरती

By नारायण बडगुजर | Published: October 21, 2022 05:41 PM2022-10-21T17:41:52+5:302022-10-21T17:42:54+5:30

दामिनी पथकाला हिरवा झेंडा....

Two crore fund for Pimpri-Chinchwad police vehicles; Recruitment will be held for 200 seats | पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहनांसाठी दोन कोटींचा निधी; २०० जागांसाठी होणार भरती

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहनांसाठी दोन कोटींचा निधी; २०० जागांसाठी होणार भरती

googlenewsNext

पिंपरी : शहर पोलीस दलासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यातील पोलीस भरतीत २०० जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भरण्यात येतील. तसेच आयुक्तालयाला नवीन वाहनांसाठी दोन कोटी रुपये देण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

पालकमंत्री पाटील यांचा शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरात दौरा झाला. त्यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. शहर पोलीस दलाच्या अडचणी समजून घेऊन आढावा घेतला. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त डाॅ. संजय शिंदे, उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे, मंचक इप्पर, आनंद भोईटे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर उषा ढोरे, महापालिकेचे माजी सभागृह नेते नामदेव ढाके, एकनाथ पवार उपस्थित होते. 

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी व मुख्यालयासाठीच्या जागांचे प्रस्ताव मार्गी लावण्यात येतील. तसेच सायबर पोलीस ठाणे मंजुरीसाठी देखील प्रयत्न केले जातील. 

चार कोटींची मागणी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला आणखी वाहने पाहिजे आहेत. त्यासाठी चार कोटींच्या निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बैठकीत सांगितले. त्यानुसार वाहनांसाठी दोन कोटी रुपये देण्यात येतील, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. तसेच यावेळी गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. शहर पोलीस दलातील मनुष्यबळ, गुन्हेगारीचे स्वरुप, सायबर क्राईम, गंभीर गुन्ह्यांतील तपास, पोलिसांची विशेष कामगिरी याबाबत सादरीकरण करण्यात आले.  

दामिनी पथकाला हिरवा झेंडा
पोलीस आयुक्तालयांतर्गत दामिनी पथकाची कार्यान्वित केले आहे. सहायक आयुक्तांच्या विभागस्तरावर हे पथक कार्यरत राहणार आहे. एका विभागासाठी तीन दुचाकी या पथकाला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी २४ महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थीनी तसेच महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पथक सजग राहणार आहे. या पथकाला पोलीस आयुक्तालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला.

Web Title: Two crore fund for Pimpri-Chinchwad police vehicles; Recruitment will be held for 200 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.