नाट्यव्यवसायाला दोन कोटींचा फटका; कोरोनानंतर तरी प्रेक्षक पुन्हा नाट्यगृहांकडे वळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 04:54 PM2020-04-24T16:54:54+5:302020-04-24T17:01:31+5:30
गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच रंगभूमी बालनाटकांपासून वंचित राहणार
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोरोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्रांचे आर्थिक गणित बिघडले आहे. नाट्यव्यवहाराचे कमालीचे नुकसान झाले असून, भविष्यातील चिंतेने निमार्ते, दिगदर्शकांपासून पडद्यामागच्या कलाकारांपर्यंत सर्वच जण भांबावले आहेत. एका महिन्यात नाट्यव्यवसायाचे सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच रंगभूमी बालनाटकांपासून वंचित राहणार आहे. कोरोनाच्या भीतीमुळे संकट टळले तरी प्रेक्षक पुन्हा नाट्यगृहांकडे वळणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईनंतर पुणे ही व्यावसायिक नाटकांची पंढरी समजली जाते. सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरातील नाट्यरसिकांचा मोठा वर्ग आहे. रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी नाट्यनिर्माते, कलाकार, दिगदर्शक यांच्यापासून पडद्यामागच्या कलाकारांपर्यंत मोठी टीम कार्यरत असते. कोरोना विषाणूच्या उद्रेकाने या संपूर्ण वतुर्ळाचे कंबरडे मोडले आहे. अचानक आलेल्या या संकटाने सर्व जण भांबावले आहेत. मनोरंजनाची साधने बदलल्यामुळे आधीच नाटकांकडे वळणारा प्रेक्षकवर्ग गेल्या काही वर्षात कमी झाला आहे. त्यातच कोरोनाच्या संकटाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होण्यास सप्टेंबर महिन्यापर्यंत वाट पहावी लागेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे आर्थिक फटका कसा भरून काढायचा, या चिंतेने नाट्यवतुर्ळाला व्यापले आहे.
मार्चमध्ये शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिल आणि मे महिने नाटकांच्या दृष्टीने सुगीचे दिवस मानले जातात. या काळात नाटकांच्या प्रयोगांची संख्या वाढते, नवीन नाटके रंगमंचावर येतात. बालनाटकांसाठी तर हा हक्काचा कालावधी असतो. बालरसिकांसाठी या काळात येणारी नाटके म्हणजे पर्वणीच असते. मात्र, यंदा हा काळ कोरोनाने ग्रासला असल्याने रंगभूमी बालनाट्याला मुकली आहे. गेल्या ५० वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उदभवली आहे. व्यावसायिक नाटकांचे पुण्यात या काळात महिन्याला सात-आठ प्रयोग होतात. बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे नाटकांचे सर्वाधिक प्रयोग होतात. प्रत्येक नाटकामागे दीड-दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, संपूर्ण नाट्यसृष्टीला दोन कोटींचा फटका बसला आहे.
-----
कोरोनाच्या संकटानंतर तरी प्रेक्षक नाट्यगृहांकडे वळणार का?
कोरोनाचे संकट टळून नाट्यगृहे खुली होण्यास ऑगस्ट-सप्टेंबर महिना उजडणार आहे. मात्र, लोकांच्या मनातील भीती मात्र एवढ्यात कमी होणारी नाही. त्यामुळे तिकिटांचे दर कमी करून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून नाट्यगृहे खुली केली तरी प्रेक्षक नाट्यगृहांकडे वळतील का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
-----
या काळात रंगभूमीवर नवीन नाटके येतात. पावसाळयापर्यंत नाटकांना चांगला प्रेक्षकवर्ग लाभतो. मात्र, आता कोरोनाने आर्थिक चक्र उलटे फिरवले आहे. बालनाटके तर यंदा रंगभूमीवर येणारच नाहीत. पडद्यामागील कलाकारांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्यांचा रोजगार बुडाल्याने उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाट्यसृष्टीतील काही मंडळी एकत्र येऊन निधी उभारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कोरोनाच्या संकटाने कोट्यवधीचे नुकसान केले असून, परिस्थिती पूर्ववत व्हायला किती वेळ लागेल, ते सांगता येणार नाही.
- सुनील महाजन
-----
एप्रिल-मे महिना हा नाटकांच्या दृष्टीने चांगला हंगाम असतो. या काळात बालनाट्ये, मराठी संगीताचे कार्यक्रम यांची रेलचेल असते. मात्र, यंदा अचानक उदभवलेल्या संकटाने सर्व आर्थिक गणित मोडीत काढली आहेत. पडद्यामागील कलाकारांची अपरिमित हानी झाली आहे. मनोरंजन ही जीवनावश्यक गरज नसल्याने गणेशोत्सवाच्या काळात तरी नुकसान भरून निघेल का, याबाबत साशंकता आहे.
- प्रवीण बर्वे