पुण्यातील खड्डे ‘खाता’हेत महिन्याकाठी दोन कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 06:00 AM2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:04+5:30
रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींच्या टीकेचे धनी...
लक्ष्मण मोरे-
पुणे : पुणे शहर ‘मोस्ट लिव्हेबल सिटी’ ठरल्यामुळे की काय पण सर्वच महाग होत चालले आहे. मग त्याला पुण्यातील रस्ते तरी कसे अपवाद ठरतील. रस्तेच काय परंतू, रस्त्यांवरील खड्डे सुद्धा महागडे ठरु लागले आहेत. पुण्यातील खड्डे महिन्याकाठी दोन कोटी रुपये ‘खात’ आहेत. शहरातील रस्त्यांच्या ‘रिसर्फेसिंग’ वर जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये तब्बल २२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून यामध्ये पावसाळ्यानंतर करण्यात आलेल्या कामांचाही समावेश आहे. शहरात एकूण चौदाशे किलोमीटरचे रस्ते असून यातील एक हजार किलोमीटरच्या डांबरी रस्त्यांवर या पैशातून कामे झाल्याचे पथ विभागाकडून सांगण्यात आले आहे. परंतू, अद्यापही बहुतांश भागात खड्डे आणि रस्त्यांची बिकट अवस्था असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन पालिकेच्या मुख्य सभेमध्येही पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींच्या टीकेचे धनी ठरले आहे. शहरात मेट्रो तसेच अन्य विकास कामांमुळे होत असलेल्या त्रासाला नागरिक कंटाळलेले आहेत. आजही शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये रस्त्यांची खोदाई सुरू असून, पालिकेच्या विविध विभागांमधील समन्वयाअभावी रस्ते वारंवार खोदावे लागत आहेत. खोदाईमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. कूर्मगतीने चालणाऱ्या या कामांमुळे पुणेकरांचा मात्र संताप वाढू लागला आहे. वाहनचालकांना तर कसरत करतच वाहने चालवावी लागतात.
रस्त्यांच्या कामांच्या सुमार दर्जामुळे वारंवार रस्ते उखडणे, खड्डे पडणे आदी कामांकरिता वारंवार खर्च करावा लागत आहे. यासोबतच रस्त्याचे काम झाल्यानंतर ड्रेनेज, जलवाहिनी, विद्युतवाहिनी अथवा एमएनजीएलच्या गॅसवाहिनीसाठी रस्ता पुन्हा खोदावा लागतो. रस्त्यांची कामे अर्धवट ठेवणाऱ्या तसेच ही कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर मात्र फारशी कारवाई होताना दिसत नाही. कामाचा दर्जा तपासण्यासोबतच हे काम वेळेत पूर्ण होईल हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या ‘प्रायोरिटी’ ठरलेल्या असल्याने रस्त्यांची वारंवार खोदाई केली जात असल्याचे चित्र आहे.
पालिकेने रस्त्यांच्या दुरुस्ती, रिसर्फेसिंग, खड्डे बुजविणे आदी कामांकरिता आतापर्यंत २२ कोटी खर्च रुपये केले आहेत. पावसाळ्यात बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडले होते. त्यातील मालही वाहून गेला होता. पालिकेने वापरलेले केमिकलही उपयोगी ठरले नव्हते. महिन्याकाठी रस्त्यांच्या या किरकोळ कामांवरच दीड कोटींपेक्षा अधिक खर्च होत आहे. हा खर्च केवळ पथ विभागाचाच नसून यामध्ये स्थानिक क्षेत्रिय कार्यालयांमार्फत केली जाणाºया कामांचाही समावेश आहे. समाविष्ठ गावांसह संपुर्ण हद्दीमध्ये एकून ६.५ लाख चौरस मीटरचे डांबरीकरण या दुरुस्तीच्या कामांमध्ये करण्यात आले आहे. रिसर्फेसिंगच्या कामांसाठी आस्फेट (एसी) आणि डेन्स बिट्युमायनस मॅकॅडम (डीबीएम) या मालाचा वापर केला जातो. वर्षभरात साडेसात मेट्रिक टन एसी आणि ६५ मेट्रिक टन डीबीएमचा वापर करण्यात आला आहे.
पालिकेच्या पथ विभागाकडून यातील बहुतांश कामे करण्यात आलेली असली तरी प्रकल्प विभाग, वाहतूक विभाग, स्थानिक क्षेत्रिय कार्यालयांकडून मोठ्या प्रमाणावर कामे झालेली आहेत. यामध्ये रस्त्यांसह उड्डाणपूल, पुलांखालील रस्त्यांचाही समावेश आहे. यामध्ये रिसरफेसिंग, रस्ते दुरुस्ती, पॅच वर्क, खड्डे दुरुस्तीची कामे करण्यात आलेली आहेत.
=====
शहरात २५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांचाही यामध्ये समावेश आहे. परंतू, नव्याने रस्ते बांधणे, कलव्हर्ट बांधणे वगैरे कामांचा यामध्ये समावेश नाही. शहरात एकूण चौदाशे किलोमीटरचे रस्ते असून त्यातील ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंटचे आहेत. आतापर्यंत २२ कोटी रुपये खर्च करुन केलेली कामे प्रामुख्याने डांबरी रस्त्यावर झालेली आहेत.