Pune Police: राज्य परीक्षेचा आयुक्त तुकाराम सुपेच्या घरी 'दोन कोटींचे' घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 12:17 PM2021-12-20T12:17:06+5:302021-12-20T13:39:13+5:30
तुकाराम सुपे याला पोलिसांनी पकडल्याचे समजल्यानंतर त्याच्या पत्नीने हा ऐवज मेव्हणाकडे दिला होता
पुणे: राज्य परीक्षेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगा जप्त केल्या असून त्यात तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांची रोकड तसेच एकूण ४४ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा जवळपास २ कोटी रुपयांहून अधिकचा ऐवज जप्त केला आहे. तपासात सापडलेल्या दागिन्यांचे मुल्यांकन सोनारांमार्फत करण्यात येत आहे
घरी दुसऱ्यांदा टाकलेल्या धाडीमध्ये २ कोटी रुपयांची रोकड, दागिने सापडले असून पोलिसांनी जप्त केले आहेत. तुकाराम सुपे याला पोलिसांनी पकडल्याचे समजल्यानंतर त्याच्या पत्नीने हा ऐवज मेव्हणाकडे दिला होता. पोलीस चौकशीत ही माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी १ कोटी ९८ लाख रुपयांची रोकड व दागिने जप्त केले आहेत. याअगोदर तुकाराम सुपे याच्या घरातून ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने, ५ लाख ५० हजारांच्या ठेवी असा ९६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
आरोपीकडे पैशांच्या दोन बॅगा पैकी त्याचे मुलीकडे एक बॅग ठेवल्याची तसेच त्याचे जावयाने त्याच्या मित्राकडे आरोपीकडील दुसरी पैशांची बॅग ठेवल्याची माहिती मिळाल्याने आरोपीचा जावई नितीन पाटील व मुलगी कोमल पाटील यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्या चर्होली येथील घरी ९७ हजार रुपये मिळाले. मात्र, दोन्ही बॅगा न मिळाल्याने अधिक चौकशीत नितीन पाटील याने त्याचा मित्र विपीन याच्या वाघोली येथील औरा कॉन्टी सोसायटीतील फ्लॅटची झडती घेतली. त्यात दोन्ही बॅगा व सोबत एक सुटकेश मिळाली. त्यातील पैशांची मोजदाद केली. त्यात १ कोटी ५८ लाख ३५ हजार १० रुपये इतकी रक्कम आढळली. बॅंगासोबत आढळलेल्या सुटकेस व एक बॅगमध्ये प्लॉस्टीकच्या पिशवीमध्ये दागिन्यांच्या ४४ डब्या आढळून आल्या.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजय पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उपनिरीक्षक डफळ, पडवळ, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, नितेश शेलार, नितिन चांदणे,कोमल भोसले, सौरभ घाटे यांनी ही कामगिरी केली