कोब्रा सापाचे दोन कोटींचे विष जप्त : विक्रीसाठी पुण्यात आलेल्या चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 07:37 PM2019-06-07T19:37:44+5:302019-06-07T19:39:11+5:30
बेकायदेशीररीत्या कोब्रा जातीच्या सापाचे तब्बल एक लीटर विष जवळ बाळगणार्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने अटक केली. या विषाची आंतराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत 2 कोटी 28 हजार 300 रुपये आहे. चौघांनाही शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनाविन्यात आली आहे.
पुणे : बेकायदेशीररीत्या कोब्रा जातीच्या सापाचे तब्बल एक लीटर विष जवळ बाळगणार्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने अटक केली. या विषाची आंतराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत 2 कोटी 28 हजार 300 रुपये आहे. चौघांनाही शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनाविन्यात आली आहे.
हिमांशु तिलक साहू (28, रा. कांकेर, छत्तीसगड), दशरथ निरंजन हलदार (38, रा. रायपूर, छत्तीसगड), विकास मनोहर भैसारे (34, रा. आरमोरी, गडचिरोली), महेंद्र रावसाहेब जाधव (37, अंबड रोड, जालना) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक अनिल पांडुरंग ऊसुलकर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कॅम्प परिसरात चौघेही संशयित आरोपी कोब्रा जातीचे विष विक्रीसाठी येणार असल्याची खबर युनिट 2 च्या गुन्हे शाखेला मिळाला. त्यानुसार कॅम्प परिसरात चौघेही आल्यानंतर संशयीतरित्या हालचालीवरून चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून कोब्रा सापाचे एक हजार मिली सापाचे विष त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. चौघांवर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
शुक्रवारी दुपारी चौघांना पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. चौघांपैकी दोघे छत्तीसगड येथील रहिवासी असून एक जण जालना तर एक जण गडचिरोली येथील रहिवासी आहे. त्यांनी हे विष नेमके कोठून आणले, ते पुण्यात कोणाला विकणार होते ? त्यांच्याकडे आणखी काही प्रतिबंधित वन्यप्राणी सामग्री आहे का याचाही तपास पोलिसांना करायचा आहे. जप्त विष हे मोठ्या प्रमाणात असून यामागे कोणती आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग आहे का ? याचा तपास होणे गरजेचे असल्याने चौघांनाही सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील भानुप्रिया पेटकर यांनी केली. गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जयवंत जाधव करीत आहेत.