Pune News | नीरा उजव्या कालव्यातून १९ जूनपर्यंत दोन आवर्तने
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 09:55 AM2023-04-27T09:55:17+5:302023-04-27T10:00:01+5:30
कालवा सल्लागार समिती बैठकीत निर्णय...
पुणे : नीरा प्रकल्पातील भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून दुसरे आवर्तन १३ मे ते १९ जूनपर्यंत देण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नीरा प्रकल्पात उपयुक्त साठ्याच्या ४७.५० टक्के म्हणजेच २२.९६ टीएमसी पाणी उपलब्ध असून उन्हाळी हंगामात नीरा उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी १३.९३ टीएमसी पाणी व बिगर सिंचनासाठी १४.७८ टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे.
या बैठकीस आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, दीपक चव्हाण, समाधान आवताडे, भीमराव तापकीर, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप उपस्थित होते.
नीरा डाव्या कालव्याची दोन आवर्तने
नीरा डाव्या कालव्याला १ मार्चपासून ३० एप्रिलपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून लगेच १ मेपासून ३० जूनपर्यंत दुसरे आवर्तन देण्यात येणार आहे. नीरा डावा कालवा एका ठिकाणी फुटल्याचा प्रकार घडला होता. ती दुरुस्ती पूर्ण झाली असून तेथील उर्वरित चाऱ्यांना प्राधान्याने सोडण्यात यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महापालिकेला पाणी पुरविण्यात येते. त्याशिवाय भामा व भीमा नदीत १५ ते २७ मे पर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पवना धरणात ३.२३ टीएमसी पाणीसाठा असून पिंपरी चिंचवड महापालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले असल्यामुळे १५ जुलैपर्यंत पाणीवापर निश्चित करण्यात आला असला तरी तो पुढील कालावधीतही पुरणार आहे.
चासकमान प्रकल्पाची तीन आवर्तने
चासकमान प्रकल्पाअंतर्गत चासकमान आणि कलमोडी धरणात मिळून एकूण ३.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. योग्य नियोजनामुळे उन्हाळी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. १ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन सुरू आहे. दुसरे आवर्तन ५ मे ते ३ जूनपर्यंत आणि तिसरे आवर्तन ८ मे ते १७ जूनपर्यंत देण्याचे चासकमान कालवा सल्लागार समिती बैठकीत ठरले.