कॉसमॉस दरोडाप्रकरणी दोघे अटकेत, न्यायालयाने सुनावली ७ दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 01:02 AM2018-09-12T01:02:12+5:302018-09-12T01:02:26+5:30
कॉसमॉस दरोडाप्रकरणी भिवंडी आणि औरंगाबाद येथून चतु:शृंगी पोलिसांनी मंगळवारी (दि. ११) दोघांना अटक केली आहे.
पुणे : कॉसमॉस दरोडाप्रकरणी भिवंडी आणि औरंगाबाद येथून चतु:शृंगी पोलिसांनी मंगळवारी (दि. ११) दोघांना अटक केली आहे.
या व्यतिरिक्त पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी बनावट (क्लोन) डेबिटकार्डद्वारे कोल्हापूर येथील विविध एटीएम केंद्रातून ८९ लाख ४७ हजार ५०० रुपयांचे काढल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. न्यायालयाने दोघा अटक आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
फहिम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स, भिवंडी), फहिम अझीम खान (वय ३०, रा. सीमा हॉस्पिटलच्या मागे, आझादनगर औरंगाबाद) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करुन तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटून नेले होते. ही घटना ११ ते १३ आॅगस्ट दरम्यान झाली होती. यातील अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध एटीएम केंद्रातून काढण्यात आली आहेत. यात ४१३ बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून २ हजार ८०० व्यवहार करण्यात आले आहेत. तर, १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून, त्यातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून गेले आहेत.
मुंबई, इंदूर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली. मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरून ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माहितीवरुन केलेल्या तपासात अटक केलेल्या आरोपींनी पाच साथीदारांच्या मदतीने पस्ैो काढल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित आरोपींनी बनावट डेबिट कार्डद्वारे पैसे काढल्याचे दिसून येत आहे.
आरोपींनी कोल्हापूरमधून पैसे काढण्यासाठी ९५ बनावट डेबिट कार्डचा वापर केला आहे. बनावट कार्ड कोठे तयार केली, त्यांना त्याचे साहित्य कोणी पुरविले, आरोपींनी कॉसमॉस बँकेचा डाटा कसा मिळविला, बँकेचे सर्व्हर हॅक होणार याची माहिती कशी मिळाली, संबंधित गुन्हा आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा असल्याने याचा शोध घेण्यासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सायबर क्राईम विभागाच्या गुन्हे शाखेने केली होती.
कोल्हापुरातून ८९ लाख रुपये काढले
अटक केलेल्या दोघा आरोपींनी पाच साथीदारांसह ११ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी ३ ते रात्री दहा या वेळेत बनावट डेबिटकार्डद्वारे ८९ लाख ४७ हजार ५०० रुपये काढल्याचे निष्पन्न झाले आहे. कोल्हापुरातील एयू स्मॉल फायनान्स, सारस्वत बँक, एसव्हीसीएल, कॉर्पोरेशन, द कमर्शिअल को आॅपरेटिव्ह, एचडीएफसी, अॅक्सिस, एसबीआय, युनियन बँक, पंजाब, महाराष्ट्र, राजाराम बापू सहकारी या बँकांच्या एटीएममधून पैसे काढल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी तब्बल ९५ बनावट डेबिट कार्ड वापरण्यात आली.
खातेदारांनी काढले अतिरिक्त पैसे
सायबर हल्ल्याच्या कालावधीत अनेक खातेदारांना खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा अधिक रक्कम दिसत होती. तसेच ती काढतादेखील येत होती. त्याचा गैरफायदा घेत काही जणांनी खात्यातील शिल्लक रक्कमेपेक्षा अधिक रक्कम काढली. अशा २७ खातेदारांकडून सायबर विभागाने ३ लाख ५५ हजार रुपये जप्त केले आहेत.