मान्सून दोन दिवस आधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 06:41 AM2018-05-19T06:41:31+5:302018-05-19T06:41:31+5:30
यंदा चांगले पाऊसमान होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानंतर आता आणखी एक सांगावा आला आहे. मान्सून अंदमानमध्ये २३ मेपर्यंत, तर केरळ किनारपट्टीवर २९ मे रोजी धडकणार आहे.
पुणे : यंदा चांगले पाऊसमान होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानंतर आता आणखी एक सांगावा आला आहे. मान्सून अंदमानमध्ये २३ मेपर्यंत, तर केरळ किनारपट्टीवर २९ मे रोजी धडकणार आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रात दोन दिवस आधी ५ जूनपर्यंत दाखल होण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांपूर्वीच स्कायमेट संस्थेने मान्सून २८ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर, शुक्रवारी हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सून दाखल होत असल्याचे जाहीर केले. मान्सून दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. अंदमानमध्ये मान्सूनचे २० मे रोजी होते. या वर्षी २३ मेपर्यंत मात्र अंदमान व दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागर या भागांत मान्सून
दाखल होईल. त्यानंतर, अपेक्षित स्थिती कायम राहिल्यास पुढील सहा दिवसांमध्ये केरळच्या किनारपट्टीवर सरी बरसतील. त्यानंतर, महाराष्ट्रात सुखसरींचा वर्षाव सुरू होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
>केरळात साधारणपणे १ जून आणि महाराष्ट्रात ७ जून रोजी मान्सून दाखल होतो. यंदा केरळात २९ मे रोजी दाखल होणार असल्याने महाराष्ट्रातही दोन दिवस आधी येऊ शकतो, असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.