नारायणगाव येथे पाण्याची टाकी साफ करताना एका अल्पवयीन मुलासह दोन जणांचा गुदमरून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 09:35 PM2020-04-04T21:35:16+5:302020-04-04T21:36:26+5:30
कांदळी एमआयडीसी मधील फिनीक्स पॉलिमर इंडस्ट्रीज कंपनीतील घटना
नारायणगाव : कांदळी एमआयडीसी मधील फिनीक्स पॉलिमर इंडस्ट्रीजच्या पाण्याची टाकी साफ करीत असताना १५ वर्षीय एक अल्पवयीन मुला सह दोनजण टाकीत गुदमरून मृत्यूमुखी पडले आहेत तर एकजण गंभीर जखमी झाला असून नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना शनिवारी ( दि. ४) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली .
राजुकुमार कलेश्वर ठाकुर (वय १५, सध्या रा. कांदळी वसाहत,ता.जुन्नर जि. पुणे मुळ रा. मचहा त्रिवेनीगंज, जि.सुपौल, बिहार ) व बिट्टुकुमार महेंद्र यादव (वय १९) सध्या रा.कांदळी वसाहत, मुळ तिनमांगी, जि. सुपौल, बिहार) हे दोनजण टाकीत गुदमरून मृत्यूमुखी पडले आहेत . तर रसुल युनुस तांडेल (वय ३५ ) हे जखमी असून नारायणगाव येथील डॉ . मिनू मेहता मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत . या अपघाताची माहिती फिर्यादी जावेद अस्लम शेख (वय ३७ ) रा. वारुळवाडी नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे यांनी दिली आहे.
याबाबत घोडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार , कांदळी एमआयडीसी मधील फिनीक्स पॉलिमर इंडस्ट्रीज हि कंपनी आहे , या कंपनीच्या मालकाचे सांगण्यावरून कंपनीमध्ये असलेल्या पाण्याची टाकी साफ करण्यास वरील तिघेजण गेले होते , त्यापैकी राजुकुमार व बिट्टुकुमार हे पाण्याचे टाकीचे आत उतरले व रसुल हे बाहेर उभे होते . राजुकुमार हा शिडीवरून खाली उतरत असताना त्याचा तोल गेल्याने तो टाकीत पडला , त्याला वर काढण्यासाठी बिट्टु कुमार यादव याने हात दिला असता तो सुध्दा पाण्याचे टाकीत पडला.त्यांना पाण्यात पडलेले पाहून रसुल तांडेल हा टाकीत उतरला. परंतु, तो सुध्दा पाण्यात पडला. त्यानंतर त्यांना बाहेर काढून डॉ . मिनू मेहता मेमोरियल हॉस्पिटल येथे आणले असता यातील राजुकुमार व बिट्टुकुमार हे उपचारापूर्वी मृत झाले . तर रसुल तांडेल यांची प्रकुती चिंताजनक आहे .