वेडीवाकडी दुचाकी चालवणे बेतले दोघांच्या जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:00 PM2018-09-21T18:00:46+5:302018-09-21T18:04:35+5:30
वेगात जात असलेल्या दुचाकीने दुस-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
सहकारनगर : वेगात जात असलेल्या दुचाकीने दुस-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहे. पुणे-सातारा रस्त्यावर असलेल्या ट्रेझर पार्कजवळ गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
रोहित दिनेश पाटिल (वय २३, मुळ. नंदूरबार) व उदय गंगाधर पाटील (वय २४, रा. धुळे ) अशी मृत व्यक्तींची नावे आहे. तर, राहुल लोटण कणखर (वय २६) हा गंभीर जखमी झाला आहे. तर दुस-या दुचाकीवरील सन्नी रणजीतकुमार शर्मा (वय ३४, आंबेगाव) याला किरकोळ मार लागला आहे. शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलीस ठाण्यात मयत पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हे मित्रासोबत ट्रेझर पाकर् येथे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवणकरुण तो त्याच्या दुचाकीवर ट्रेझर पार्क सोसायटीकडून सातारा रोडने स्वारगेटला येत होते. त्याचवेळी रोहित पाटील व त्याचे दोन मित्र ट्रिपल शीट भरधाव व वेडीवाकडी दुचाकी चालवत आला. त्याने शर्मा याच्या दुचाकीला जोरात ठोकले. ही धडक इतकी भीषण होती की उदय व रोहित यांचा रस्त्यावर पडून जागीच मृत्यु झाला. तर राहुल लोटण हा गंभीर जखमी जखमी झाला. राहुलवर सध्या उपचार सुरू असून फियार्दी किरकोळ जखमी झाल्याने त्याला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे लक्ष वेधण्यासाठी तरुण पल्सर, अक्टिव्हा, यामाहासारख्या दुचाकी वेड्यावाकड्या पध्दतीने भरधाव वेगाने चालवताना दिसतात. ट्रीपल गाडी चालवत कर्णकर्कश हॉर्न वाजवणे व तोंडातून विचित्र आवाज काढणे ही अशा तरुणांसाठी क्रेझ बनली आहे. त्यांना इतर वाहन चालकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सरळ शिवीगाळ किंवा दमदाटी केली जात, असल्याचे प्रकारही घडले आहेत.
...........................
अपघातात ट्रीपल सीट जाणा-या दोघांचा मृत्यू रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याने झाला आहे. तर त्यांचा एक साथीदार रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्या परिवाराबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही.
अनिल शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक