पुणे : होंडा सिटी कारच्या धडकेत आजी-नातवाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 10:24 AM2018-09-20T10:24:44+5:302018-09-20T10:55:32+5:30
बेदरकारपणे होंडा सिटी कार चालवत तीन ते चार वाहनांना धडक देऊन झालेल्या अपघातात आजी व नातवाचा मृत्यू झाला आहे.
विमाननगर(पुणे) - बेदरकारपणे होंडा सिटी कार चालवत तीन ते चार वाहनांना धडक देऊन झालेल्या अपघातात आजी व नातवाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला. खराडीतील रेडिसन हॉटेलसमोरील रस्त्यावर बुधवारी (19 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. अपघात करून होंडा सिटी कारचा चालक फरार झाला आहे. या भीषण अपघातात शांताबाई साहेबराव सोनवणे (वय६१वर्ष) व नयन रमेश मोकळे (वय११ वर्ष) नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी होंडा सिटी कार (एमएच १२ एलडी १०११) मधील अज्ञात चालकाविरोधात बेदरकारपणे कार चालवून अपघात करुन दोघांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आप्पासाहेब मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री चंदननगर व परिसरातील सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या. रात्री साडेआठ वाजण्याच्या समारास एका होंडा सिटी कारने काही वाहनांना रेडीसन हॉटेलसमोर धडक दिल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून चंदननगर पोलिसांना मिळाली होती. चंदननगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एक जेष्ठ नागरिक महिला एक लहान बालक व इसम जखमी झाला होता.
अपघात करून होंडा सिटीचा कारचालक फरार झाला. या अपघातातील गंभीर जखमी शांताबाई सोनवणे व नयन मोकळे यांना नंतर उपचारासाठी कमांड हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याच अपघातात कराड येथील 40 वर्षीय इसमदेखील जखमी झाला असुन त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. होंडा सिटी कार रेडिसन हॉटेल कडुन टस्कन सोसायटी, खराडीकडे निघाली होती. यावेळी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्यावरील दोन ते तीन वाहनांना धडक दिली.
याचवेळी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या शांताबाई सोनवणे व नयन मोकळे या आजी नातवाला देखील या चालकाने उडवले. या दोघंही जण जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.