अधिकाऱ्यांचे दोन वेगळे नियम का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:03 AM2018-09-19T02:03:38+5:302018-09-19T02:03:57+5:30
विकासकामांच्या सौजन्याच्या नावाला आक्षेप; देऊळगावगाडा ग्रामस्थांचा संताप, धडा देण्याचा निर्धार
खोर : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथील विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेच्या नूतनीकरणाचे काम चालू असून, या परिसरामधील ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेचा जीर्णोद्धार करण्याचा ध्यास घेतला. तब्बल १० लाख रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेच्या घडामोडीच्या ध्यासातून आज विठ्ठलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही दौंड तालुक्यातच नव्हे, तर पुणे जिल्ह्यामध्ये उठून दिसत आहे. मात्र, याच शाळेच्या देखण्या रूपाला डाग लागला असून, ग्रामस्थांनी एक-एक लाख रुपये वर्गणी देऊन कलामंच, प्रवेशद्वार, स्टेज स्वखर्चाने बांधून दिले आहे. या बदलास या कलामंच, प्रवेशद्वार यावर सौजन्य म्हणून नाव दिले आहे.
पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे हे शाळेला दिलेले सौजन्याचे नाव काढून टाका असे सांगतात, तर कलामंच, प्रवेशद्वार व नूतनीकरणाचे सुरू असलेले काम बेकायदेशीर असल्याचा दावा दौंडचे गटविकास अधिकारी गणेश मोरे करीत आहेत. मग, आमच्या शाळेचे काम बेकायदेशीर आहे, सौजन्याचे नाव काढून टाका, असे प्रशासन म्हणत आहे याला आमचा विरोध नाही;
मात्र पुणे जिल्ह्यामधील सर्वच ठिकाणच्या शासकीय-प्रशासकीय व कोनशिलेवरचे सौजन्याचे नाव काढून टाका, असे मत देऊळगावगाडाचे माजी सरपंच व सौजन्याच्या नावाचे प्रमुख डी. डी. बारवकर यांनी व्यक्त केले आहे.
आज पुणे जिल्ह्यात किती तरी शाळा आहेत की, प्रत्येक शाळेवरती, कोनशिलेवरती सौजन्याचे नाव देण्यात आले आहे. मग, यामध्ये पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी का जातीने लक्ष घालत नाहीत, तसेच कित्येक शाळांचे नूतनीकरणाचे काम झाले, अनेक ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात आले, तेथील बांधकामाला परवानगी घेतली का, हे आधी तपासा व मगच विठ्ठलवाडी शाळेच्या संदर्भात निर्णय द्या, असे डी. डी. बारवकर यांनी म्हटले आहे.
याच देऊळगावगाडा केंद्रामधील कुसेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सन २0१६ मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंतराव शितोळे हे सौजन्याच्या नावाचे उद्घाटन करतात. मग, त्यांना शासनाचे सौजन्याच्या नावासंदर्भात प्रशासकीय परिपत्रक त्यावेळी का दिसले नाही, एकाच केंद्रामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाºयाचे दोन वेगळे नियम का, असे विठ्ठलवाडी ग्रामस्थवर्गांचे म्हणणे आहे.
सौजन्याची नावे शासनाच्या परिपत्रकामध्ये टाकत नाही. जिल्ह्यामधील सर्वच ठिकाणच्या शासकीय-प्रशासकीय व कोनशिलेवरचे सौजन्याचे नाव काढून टाका. मगच आम्ही आमच्या शाळेचे नाव काढून टाकू.
- डी. डी. बारवकर
(माजी सरपंच)
आम्ही काय शोभेची बाहुली आहे काय?
गटविकास अधिकाºयांनी शैक्षणिक वाढ विकासाच्या संदर्भातील सर्व अधिकार हे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांना दिले आहेत. त्यानुसारच ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर करून घेऊनच शाळा व्यवस्थापन समितीने हे बांधकाम केलेले आहे आणि आता गटशिक्षणाधिकारी गणेश मोरे हे हेच बांधकाम बेकायदेशीर असल्याचा दावा करीत आहेत. मग, आम्ही काय शोभेची बाहुली आहे काय ?
- केशव बारवकर
ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलवाडी