परदेशात घेतले दोन डोस; भारतात कोणता घ्यायचा?; ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 07:32 AM2022-01-11T07:32:48+5:302022-01-11T07:32:54+5:30
प्रिकॉशन डोससाठी पात्र असूनही डोस घेता येईना
- नम्रता फडणीस
पुणे : गतवर्षी लॉकडाऊन काळात परदेशात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी तिथेच दोन डोस घेतले. आता भारतात आल्यानंतर खबरदारी म्हणून नक्की कोणत्या कंपनीचा डोस घ्यायचा, याबाबत ज्येष्ठांमध्ये संभ्रम आहे. यातच शासनाच्या कोविन ॲपवर त्यांची नोंदणी झालेली नसल्याने दोन डोस घेऊनही डोस न घेतलेल्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या डोससाठी कशाप्रकारे नोंदणी करायची, असा प्रश्न ज्येष्ठांना पडला आहे. शासनाने अशा नागरिकांसह इतरांसाठी सुस्पष्ट नियमावली जाहीर करावी, अशी सूचना वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे.
राज्यातील सर्व शासकीय, महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ६० वर्षांवरील वयाच्या सहव्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीचा प्रिकॉशन (प्रतिबंधात्मक) डोस मिळण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे.
काही ज्येष्ठ नागरिक हे लॉकडाऊन काळात परदेशात अडकले होते. तिथेच त्यांना लसीचे दोन डोस घ्यावे लागले. आता ते भारतात परतले आहेत. शासनाच्या निकषानुसार एप्रिल २०२१ पूर्वीच दुसरा डोस झाला आहे. त्यामुळे प्रिकॉशन डोससाठी ते पात्र आहेत. त्यांनी तेथील कंपन्यांची लस घेतली आहे. ती भारतात सहज उपलब्ध नाही. नियमानुसार ज्या लसीचा डोस घेतला, त्यांना त्याच लसीचा डोस दिला जाणार आहे. मग आम्ही कोणत्या कंपनीचा डोस घ्यायचा? त्यामुळे पात्र असूनही तिसरा डोस घ्यायचा तरी कसा? असा प्रश्न पडल्याचे ज्येष्ठांंनी सांगितले.
भारतातील अनेक लोकांनी एकही डोस घेतलेला नाही, अशी नुकतीच आकडेवारी जाहीर झाली. त्या यादीत परदेशातून आलेले भारतीय आहेत. भारत सरकारने त्या-त्या देशातील सरकारशी संपर्क करून तिथे दोन डोस घेतलेल्या भारतीयांची माहिती घ्यावी आणि कोविन ॲपमध्ये समाविष्ट करावी. हा प्रश्न सरकारनेच सोडवायला हवा. सद्यस्थितीत एकमेव मार्ग म्हणजे ज्येष्ठ नागरिक कोविन ॲपमध्ये नोंदणी करून एक आणि त्यानंतर दुसरा डोस घेऊ शकतात.
- डॉ. अविनाश भोंडवे, राष्ट्रीय अधिष्ठाता, कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स, आयएमए