दौंड येथे विद्युत महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना लाच घेताना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 09:04 PM2020-01-29T21:04:37+5:302020-01-29T21:05:40+5:30
मीटरची पुन्हा जोडणी करून जास्त बिल न पाठविण्यासाठी तक्रारदारकडून ६० हजारांची मागणी दोघांवर गुन्हा दाखल
दौंड : दौंड येथील विद्युत महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे यांना ३० हजारांची लाच खासगी व्यक्ती विक्रम पाटणकर (रा. नानवीज, ता. दौंड) यांच्यामार्फत घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी दिली. याप्रकरणी मिलिंद डोंबाळे (रा. पुणे) आणि विक्रम पाटणकर (रा. नानवीज, ता. दौंड) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकी (ता. दौंड) येथील तक्रारदार यांच्या मीटरची पुन्हा जोडणी करून जास्त बिल न पाठविण्यासाठी तक्रारदारकडून ६० हजारांची मागणी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे यांच्याकडून करण्यात आली होती.
दरम्यान, मध्यस्थ व्यक्तीच्या माध्यमातून ३० हजारांवर तडजोड झाली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाºयांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.