पुण्यात बालगंधर्ववरून दोन माजी महापौरांत तू-तू, मैं-मैं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:33 PM2022-05-19T12:33:22+5:302022-05-19T12:34:02+5:30
भाजप-राष्ट्रवादीचे माजी महापौरांमध्ये आरोप-प्रत्यारोप...
पुणे : शहरातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या ५४ वर्षांच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा विषय सध्या गाजतो आहे.आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाने सत्तेतअसताना मंजूर केलेला हा प्रस्ताव आता प्रशासनाने पुढे आणला आहे. त्यावरून अंकुश काकडे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. तेच प्रश्न आताचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना ‘लोकमत’ने विचारले व त्यांची उत्तरे घेतली.
माजी महापौर अंकुश काकडे म्हणतात...
- बालगंधर्व पुनर्विकास ३० महिन्यात पूर्ण करू, असे मुरलीधर मोहोळ म्हणतात, पण त्यांच्याच कारकिर्दीत १८ मार्च २०२१ ला महाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले. त्याचे काय झाले ते त्यांनी सांगावे. या स्मारकाची एक वीटसुद्धा रचली गेलेली नाही.
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाशेजारील बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे काम सत्तेच्या ५ वर्षांत तुम्हाला पूर्ण करता आलेले नाही याचा विसर पडला आहे का? बालगंधर्वचे तसेच झाले तर पुणेकरांनी काय करायचे?
- बालगंधर्व पुणे शहराचा अभिमान आहे, अस्मिता आहे, त्याला धक्का लावण्याचा विचार येतो तरी कसा? तिथे नक्की काय करायचा विचार आहे.
माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणतात...
- अंकुश काकडे माहिती न घेता बोलतात. गदिमा स्मारकासाठी महापालिकेने आतापर्यंत २.५० कोटी रुपये खर्च केलेत. यंदा ३ कोटी रुपयांची तरतूद केली. कोणत्याही इमारतीचे बांधकाम पाया खोदण्यापासून सुरू होते. वीट रचण्यापासून नाही याची काकडे यांना माहिती नसावी.
- बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे काम काकडे ज्या महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करतात त्याच आघाडीतील एका घटक पक्षाकडे आहे. त्यांनीच त्या पक्षाकडे ते काम का रखडले आहे, त्याबाबत विचारणा करावी. त्यांना त्याचे उत्तर नक्की मिळेल.
- बालगंधर्व पुण्याचा अभिमान, अस्मिता असल्याचे आम्हालाही माहिती आहे. आम्ही त्याचाच विकास करतो आहोत. तिथे नक्की काय होणार, प्रकल्प कसा आहे, नियोजन काय आहे याची काकडे यांनी आधी माहिती घ्यावी व नंतर बोलावे.