पवना नदीपात्रात पोहायला गेलेल्या चौघांपैकी दोघे सुखरूप, तर शोधमोहिमेत इतर दोघांचे सापडले मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 08:57 PM2021-03-15T20:57:31+5:302021-03-15T20:58:07+5:30
दोन बोटींच्या साह्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी घेतला शोध
पिंपरी: थेरगाव येथे पवना नदीपात्रात शनिवारी पोहायला गेलेल्या चौघांपैकी दोन जण सुखरूप बाहेर आले होते. पण पोलीस आणि अग्निशमन यांच्या शोधमोहिमेत रविवारी सायंकाळी बुडालेल्या दोघांचे मृतदेह सोमवारी सापडले आहेत. महापालिकेच्या पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पिंटू विठ्ठल गायकवाड (वय ३५), ओम प्रकाश जाधव (वय २५), असे बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर रवी राजकुमार गायकवाड (वय १३), नरसिंग महादेव जाधव (वय २१), असे बचावलेल्या दोघांची नावे आहेत. सर्वजण काळेवाडी येथे राहणारे आहेत.
वाकडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ आणि दीडच्या सुमारास रवी गायकवाड, नरसिंग जाधव, पिंटू गायकवाड आणि ओम जाधव हे चौघेही रविवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंचवड येथून पवना नदी पात्रातून थेरगाव येथील स्मशानभूमीजवळ येत होते. रवी गायकवाड व नरसिंग जाधव हे नदी पात्रातून सुरक्षीत बाहेर आले. मात्र पिंटू गायकवाड आणि ओम जाधव हे नदी पात्रातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध सुरू केला. तसेच याबाबत पोलीस व अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानुसार पोलीस तसेच महापालिकेच्या पिंपरी व रहाटणी केंद्रातील दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन बोटींच्या साह्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेतला. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.
एनडीआरएफ, महापालिकेच्या आपत्कालीन विभाग, अग्निशामक दलाच्या जवानांनी सोमवारी सकाळी शोधकार्य सुरू केले. बोट, पाणबुडी, डीपडायव्हर यांच्या साह्याने पथकाने शोध घेतला. सकाळी आठच्या सुमारास पिंटू गायकवाड याचा मृतदेह मिळून आला तर दुपारी एकच्या सुमारास ओम जाधव याचा मृतदेह मिळाला आहे.