महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
By admin | Published: February 29, 2016 01:01 AM2016-02-29T01:01:19+5:302016-02-29T01:01:19+5:30
लोकवस्तीपासून दूर परिसरात दुचाकीवरून येऊन आडबाजूच्या रस्त्यावर पत्ता विचारण्याचा बहाणा करून, जोडप्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने
लोणी काळभोर : लोकवस्तीपासून दूर परिसरात दुचाकीवरून येऊन आडबाजूच्या रस्त्यावर पत्ता विचारण्याचा बहाणा करून, जोडप्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीतील दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिली.
पप्पू भारत चव्हाण (वय २८) व संतोष विठ्ठल बोडरे (वय २४, दोघेही राहणार मांडवे, पन्नास फाटा, ता. माळशिरस, जि. सोलापूर ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या विरोधात वडगाव निंबाळकर (ता.बारामती) व जेजुरी (ता. पुरंदर) या दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच, पप्पू भारत चव्हाणवर कोल्हापूर जिल्ह्यातही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
दौंड तालुक्यातील भुलेश्वर व पाटस घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जोडप्यांना आडरस्त्याला गाठून पत्ता विचारण्याचा बहाणा करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, उपनिरीक्षक माने, सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, संजय जगदाळे, गुरू गायकवाड व सुभाष राऊत या पोलीस पथकाची या कामी नेमणूक केली होती.
या पोलीस पथकाने गेला महिनाभर अथक प्रयत्न करून या चोरट्यांना जेरबंद केले आहे. पुणे, सातारा व सोलापूर या तीनही जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाण्यातील संशयित गुन्हेगारांची त्यांनी माहिती गोळा केली. परिसरातील पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबे आदी ठिकाणी त्यांनी ही माहिती देऊन संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन त्यांनी संबंधित सर्वांना केले होते. तसेच फिर्यादीने दिलेल्या माहितीचा आधार घेऊन या पोलीस पथकाने संशयास्पद गुन्हेगार शोधण्यास सुरुवात केली.
संबंधित आरोपी पाटस-सुपा रस्त्यावरील वन विभागाच्या जागेत येणार असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना तातडीने जेरबंद केले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.
पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहेत. ( वार्ताहर )